शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह, मृत्यू की शिकार याबात तपास सुरू

मुनेश्‍वर कुकडे
Monday, 16 November 2020

लोधीटोला येथील अमरनाथ पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतमालकाला रविवारी (ता .15) सायंकाळच्या सुमारास दिली. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने लागलीच रात्रभर पाळत ठेवली.

गोंदिया : तालुक्‍यातील लोधीटोला (चुटीया) येथील शेतात वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही घटना सोमवारी (ता.16) सकाळी उघडकीस आली. या वाघाची शिकार झाली की, आणखी कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास वनविभाग करीत आहे.

हेही वाचा - भाऊबीजेच्याच दिवशी भावाला अखेरचा निरोप, हुतात्मा जवान भूषण सतईंच्या बहिणीचा टाहो

लोधीटोला येथील अमरनाथ पटले यांच्या शेतात पट्टेदार वाघाचा मृतदेह असल्याची माहिती गावकऱ्यांनी शेतमालकाला रविवारी (ता .15) सायंकाळच्या सुमारास दिली. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने लागलीच रात्रभर पाळत ठेवली. दरम्यान, सोमवारी (ता.16) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व वन्यप्रेमी घटनास्थळी गेले. सोबत पीटर हे श्‍वानपथकदेखील होते. पटले यांच्या शेतात पाहणी केल्यानंतर तिलकचंद शरणागत व योगराज नागपुरे यांच्या शेतातही पाहणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी पट्टेदार वाघाचे अवशेष आढळून आले. 10 ते 12 दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाला असावा, असे मृतदेहावरून दिसून आले. वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले वाघाच्या मांस व हाडाचे तुकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळा करून पांगळी येथील नर्सरीत दहन केले. घटनास्थळी विद्युत खांब असून, काही जनावरांचे पगमार्क आढळून आल्याने पट्टेदार वाघाची शिकार झाली की, अन्य कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, हे स्पष्ट कळू शकले नाही. पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेला असल्याने नर की मादी हेदेखील कळू शकले नाही, असे वन्यप्रेमींनी सांगितले. 

हेही वाचा - दुर्दैवी वास्तव! शेतकऱ्यांचा माल सडतोय धुळीत; व्यापारी माल भरून करताहेत मजा 

घटनास्थळी उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, क्षेत्रसहायक आकरे, साठवणे, दखने, वन्यजीवप्रेमी सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे व पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक गजरे, डॉ. डी. डी. कटरे, डॉ. ए. डी. जऊळकर उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body of tiger found in lodhitola of gondia