दुर्दैवी वास्तव! शेतकऱ्यांचा माल सडतोय धुळीत; व्यापारी माल भरून करताहेत मजा 

विजयकुमार राऊत 
Monday, 16 November 2020

शेतमाल खरेदी केल्यानंतर तो चोवीस तासांच्या आत यार्डाबाहेर घेऊन जाणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु या नियमाचा बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांना विसर पडल्याचे दिसुन येते. 

भिवापूर (नागपूर) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात ओटे मिळत नसल्याने धुळीने माखलेल्या जागेत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला त्यांचा माल ठेवावा लागत आहे. तर दुसरीकडे यार्डातील ओटे व शेड व्यापाऱ्यांच्या मालाने गच्च भरलेले आहेत. शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाकडे बाजार समिती प्रशासन जाणीवपुर्वक कानाडोळा करीत असल्याने येथे संताप व्यक्त केला जात आहे. 

शेतमाल खरेदी केल्यानंतर तो चोवीस तासांच्या आत यार्डाबाहेर घेऊन जाणे व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु या नियमाचा बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांना विसर पडल्याचे दिसुन येते. 

सविस्तर वाचा - 'आठ महिन्यांपासून मिळेल त्यावर पोट भरलंय, दिवाळीच्या दिवशी ऑर्डर मिळताच पोटभरून जेवलो'

शेतकऱ्यांकडुन माल खरेदी केल्यानंतर तो हप्ता, पंधरा दिवस तर कधी महिनोगणती यार्डामधील शेड व ओट्यांवर पडुन असतो. व्यापाऱ्यांना जेव्हा सोयीचे वाटेल तेव्हाच ते मालाची विल्हेवाट लावतात. याचा फटका शेतमाल विक्रीसाठी समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे. शेड व ओट्यांवर जागा मिळत नसल्याने धुळीने माखलेल्या जागेत त्यांना त्यांचा माल उतरवावा लागतो. यामुळे कापसासारख्या पीकांवर त्याचा मोठा परिणाम होतो. अन्य मालाचीसुद्धा प्रत खराब होते. यासंबंधात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मात्र याकडे समिती प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक कानाडोळा केला जात आहे. 

यार्डात कित्येक दिवस माल ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवित नाही. त्याचा गैरफायदा व्यापारीवर्ग उचलत असून ते त्यांच्या सोयीनुसार मालाची उचल करतात. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. सध्या शेतकऱ्यांकडुन धान, सोयाबीन व कापुस आदी उत्पादने विक्रीसाठी समितीच्या यार्डात मोठ्या प्रमाणात आणली जात आहेत. परंतु ओटे व शेडमध्ये माल ठेवायला जागा उपलब्ध नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते आहे. 

अधिक माहितीसाठी - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

बोलीची वेळही अनिश्चित 

विक्रीला आलेल्या शेतमालाची बोली दुपारी दोन वाजतापासुन सुरू करण्यात यावी, असा नियम आहे. परंतु याठिकाणी सायंकाळच्या सुमारास बोलीला सुरूवात होऊन रात्री उशिरापर्यंत ती सुरूच असते. याचा फटका लांबच्या गावखेड्यातुन येणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो. रात्रीच्या अंधारात त्यांना त्यांचे गाव गाठावे लागते. अनेकदा वाटमारीच्या घटना घडतात. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman put their things in shade while farmers put in dust