आंदोलनस्थळी येण्यापूर्वीच मृत्यू; रुग्णवाहिकाचालकाचा हृदयविकाराने मृत्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

प्रेमभाऊ पिकलमुंडे हे रुग्णवाहिकाचालक संपात सहभागी होण्यासाठी सोमवारी धोप येथील घरून निघाले. मात्र, वाटेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना ताबडतोब भंडारा येथे नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला.

गोंदिया  : आरोग्य विभागातील 102 रुग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असताना रुग्णवाहिकेच्या चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. 

नियमानुसार मिळत नाही वेतन 

प्रेमभाऊ पिकलमुंडे (वय 44) हे भंडारा जिल्ह्यातील धोप (ता. मोहाडी) येथील रहिवासी होते. ते मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाचालक म्हणून कार्यरत होते. गर्भवती महिला व लहान मुलांना रुग्णसेवा देता यावी, यासाठी आरोग्य विभागाकडून 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे सेवा पुरविली जाते. मात्र, शासनाने कंत्राट दिलेली कंपनी रुग्णवाहिका चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 78 रुग्णवाहिकांच्या चालकांनी 18 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला आठवडा लोटूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने रुग्णवाहिकाचालकांनी आंदोलन सुरूच ठेवले. 

संपात सहभागी होण्यासाठी जाताना... 

प्रेमभाऊ पिकलमुंडे हे रुग्णवाहिकाचालक संपात सहभागी होण्यासाठी सोमवारी धोप येथील घरून निघाले. मात्र, वाटेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना ताबडतोब भंडारा येथे नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. या घटनेने कंत्राटी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन, प्रशासनाने मृताच्या नातेवाइकांना 11 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालक संघटनेने केली आहे. 

आठवडाभरापासून सेवा ठप्पच 

गर्भवती महिला व लहान मुलांना रुग्णसेवा देता यावी यासाठी 102 रुग्णवाहिका सेवा पुरविली जाते. मात्र, कंत्राट देण्यात आलेली भोपाळ येथील कंपनी नियमानुसार वेतन देत नसल्याने वाहनचालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आठवडाभरापासून हे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे याचा फटका गर्भवती महिला व बाल रुग्णांना बसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death before agitation; Patient dies of heart attack