नियतीचा घाला! शेतात मजुरीसाठी मळणीयंत्र घेऊन गेला मालक; मात्र, यंत्रातच कमरेपर्यंत अडकल्याने गेला जीव

गणेश राऊत
Monday, 12 October 2020

रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सोयाबीन पिकाची काढणी करीत होता. त्यात मशीनचा मालक सुनील हा सोयाबीनची गंजी मळणी यंत्रात ढकलत असताना अचानकपणे त्याचा पाय यंत्रामध्ये अडकल्याने तो कमरेपर्यंत मळणीयंत्रात ओढला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

नेर (जि. यवतमाळ) : शेतात सोयाबीनची काढणी सुरू असताना मळणीयंत्रात पाय अडकल्याने कमरेपर्यंत ओढला जाऊन मळणीयंत्राचा मालक असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्‍यातील वाई ईजारा शेतशिवारातील मोहम्मद युसुफ अब्दुल सत्तार यांच्या शेतात रविवारी (ता. ११) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर मळणीयंत्रासह मजूर पसार झालेत.

सुनील वसंत जाधव (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील जाधव हा आपले यंत्र घेऊन मजुरासह वाई ईजारा शेतशिवारातील मोहम्मद युसुफ अब्दुल सत्तार यांच्या मालकीचे व जमील खा सिकंदर खा यांनी मक्‍त्याने घेतलेल्या शेतात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सोयाबीन पिकाची काढणी करीत होता. त्यात मशीनचा मालक सुनील हा सोयाबीनची गंजी मळणी यंत्रात ढकलत असताना अचानकपणे त्याचा पाय यंत्रामध्ये अडकल्याने तो कमरेपर्यंत मळणीयंत्रात ओढला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अधिक माहितीसाठी - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

घटनेची माहिती मिळताच नेर पोलिस ठाण्याचे एएसआय राजेश भगत, जमादार राजेश चौधरी, राजू कुकडे, होमगार्ड गोपाल चव्हाण, इस्माईल आझाद यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मळणीयंत्रासह मजूर घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ठळक बातमी - दोन्ही मुले ढसा ढसा रडत म्हणाले, ‘मम्मीऽऽ मम्मी पप्पाला काय झालं, ते कधी येणार’

अपघात की घातपात?

शेतात सोयाबीन पिकाची काढणी सुरू असताना शेतमालकासह शेतमजूर व मळणीयंत्रावर काम करणारेही घटनास्थळी होते. मात्र, मळणीयंत्राचा मालक असलेल्या सुनील जाधव या तरुणाचा मृत्यू होतो आणि तेथील मजूर लगेच पसार होतात. त्यामुळे सुनीलचा मृत्यू हा अपघाताने झाला की, हा घातपात आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. म्हणून पोलिस त्या दिशेने तपास करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a laborer by getting stuck in a threshing machine at Yavatmal