सर्पदंशाने गरोदर महिलेचा मृत्यू

मनोहर बोरकर
शनिवार, 23 जून 2018

मृतक पिल्ली गावडे या गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी काम करीत होत्या. त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे उपचारासाठी दाखल केले. 

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील तोडसा येथील पिल्ली तुकाराम गावडे (वय 32) या पाच महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू सर्पदंशाने झाला. वैद्यकीय उपचार न मिळाल्याने माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पिल्ली यांचे पती तुकाराम गावडे यांनी केला.

मृतक पिल्ली गावडे या गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी काम करीत होत्या. त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, आरोग्य केंद्रात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी हजार नसल्याने पिल्लीला खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात एटापल्ली येथे नेत असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. तालुक्यातील सर्वात मोठ्या परिसरातील 35 ते 40 गावांच्या नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणारे प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथे असून प्रशस्त इमारत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान सर्व सोयी डॉ. शरद कदम व डॉ. पवन राऊत असे दोन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग असा भरपूर लवाजमा व त्यावर शासनाचा कोटी रूपये खर्च होत असताना त्याच गावातील सर्पदंश झालेल्या गरोदर महिलेला उपचारांअभावी जीव गमवावा लागल्याने आरोग्य विभागावर टीका केली जात आहे. 

तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी प्रामाणिक कर्तव्य बजावत नसल्याचे तक्रारी नागरिक नेहमीच करीत असतात. मात्र, वरिष्ठ पातळीवरुन कोणतीही कार्यवाही होत नसून, उलट वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी आळीपाळीने महिन्यातील पंधरा दिवस कर्तव्यावरून सरार्स गैरहजर राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गरोदर माता पिल्ली गावडे यांचा सर्पदंश मृत्यूला तोडसा आरोग्य केंद्रातील जबाबदार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

दरम्यान, पिल्ली यांच्या मृत्यूप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गादेवार, तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कदम यांच्याशी संपर्क केला असता दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: The death of the pregnant woman by the snakebite