नागपूर ः रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बिट संरक्षित क्षेत्र परिसरातील बिहाडा खदानीत वाघ मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसला. घसरून खदानीतील पाण्यात पडून वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचा मृतदेह उद्या काढण्यात येणार आहे. वाघाचे वय शवविच्छेदनानंतर कळेल. राज्यात आतापर्यंत 17 वाघांचा मृत्यू झाला.
वर्ष- | वाघांचा मृत्यू |
2016 | 16 |
2017 | 22 |
2018 | 22 |
2019 | 17 |
(सात डिसेंबरपर्यंत) |
रामटेक वन परिक्षेत्रातील मानेगाव बिट संरक्षित वनकक्ष क्रमांक 293 परिक्षेत्रातील बिहाडी खदानीत वाघ मृतावस्थेत तरंगत असल्याचे समजताच सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी आणि मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी घटनास्थळाला भेट दिली. हा वाघ अंदाजे 55 फूट खोल खदानीत असून त्यात 25 फूट पाणी आहे. खडकाळ भाग असल्याने वाघ घसरून खदानीत पडला असावा, असे सांगितले जाते. राज्यात आतापर्यंत अकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाला. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. राज्यात वाघांच्या संख्येत यंदा झालेल्या गणनेत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मराठवाड्यासारख्या परिसरात तब्बल 40 वर्षांनी वाघ दिसू लागला आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघासह तृणभक्षक प्राण्यांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देत असल्यानेच हे शक्य झाले आहे. मानव-वन्यजीव संघर्षात वन्यजीवप्रेमींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परिसरातील नागरिकांनी वाघाच्या मृत्यूसाठी वनखात्यावर दोषारोप केलेले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.