दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॅन कागदावरच 

दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॅन कागदावरच 

नागपूर -  दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॅन तयार होत आहे. जगातील सर्वोत्तम सुंदर स्थळ व्हावे म्हणून सर्व व्यवस्था दीक्षाभूमीवर केली जाईल. त्यासाठी जितकी जागा लागेल ती उपलब्ध करून दिली जाईल शिवाय निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 सालच्या दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेच्या 59 व्या सोहळ्यात दिली होती. परंतु तीन वर्षे लोटून गेल्यानंतरही दीक्षाभूमी विकासाचा मास्टर प्लॅन तयार झाला नाही. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्‍टोबर 1956 साली नागवंशीयांच्या भूमीत लाखो अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म दिला. ती अस्पृश्‍यांची मूक्तिभूमी अर्थात "प्रकाशमार्ग' दाखवणारी दीक्षाभूमी म्हणून आकाराला आली. गेल्या पन्नास वर्षांत दीक्षाभूमीवर साडेपाच कोटी रुपये खर्चून बाबासाहेबांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारले. या स्मारकाला आता विद्यमान शासनाने पयर्टनस्थळ घोषित केले. 325 कोटी रुपयांच्या विकासाचा आराखडा तयार केला. हे पर्यटनस्थळ जरी घोषित झाले असले तरी बाबासाहेबांच्या कोट्यवधी वारसदारांसाठी विद्रोहाचे, विज्ञानाचे आणि विवेकाचे शास्त्र सांगणारी दीक्षाभूमी आहे. बौद्ध बांधवांच्या संस्कारातील ही क्रांतिभूमी ठरली आहे. आंबेडकरी माणसांच्या हृदयावर कोरलेल्या दीक्षाभूमीवर प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार सज्ज आहेत; मात्र चौथे प्रवेशद्वार सुरूच झाले नाही. वर्षानुवर्षे ते "बंद' आहे. उधाणलेल्या भीमसागराला कवेत घेण्यासाठी कृषी विभागाकडील दीक्षाभूमीचे चौथे प्रवेशद्वार सुरू करावे हीच एकमेव मागणी आहे. 

दरवर्षी दीक्षा सोहळ्याच्या वर्धापन दिनाच्या पर्वावर बाबासाहेबांच्या ओठावरचे सूर्य म्हणवणारे लाखो उपासक देशविदेशातून येतात. रात्रभर रांगेत लागून शिस्तीत बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतात. त्या दीक्षाभूमीचा 325 कोटींचा विकास आराखडा शासनाने तयार केला. 100 कोटींची पहिली घोषणा केली. "अ' दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित केले. सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाचा प्लॅन तयार केल्याची घोषणा करण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यासकडे ही जबाबदारी दिली. नोएडा येथील डिझाइन असोसिएट्‌स इन्कॉर्पोरेशनचे वास्तुविशारद हा विकास करतील, असे सांगण्यात आले. 22.4 एकर जागेत हा विकास होणार असून व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षारक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पथ, उपासकांसाठी सुविधा क्षेत्र, विद्युतीकरण, सौरऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणाचा समावेश आहे, मात्र हे सारे अद्याप कागदावरच आहे. 

आगामी काळातील विकास 
-धम्म संस्कार व प्रशिक्षण केंद्र 
-संशोधन तसेच संदर्भ अभ्यास केंद्र 
-बुद्धिस्ट सेमिनरी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून विकास होत आहे. कृषी विभागाच्या दिशेला दीक्षाभूमीचे चौथे प्रवेशद्वार आहे. ते सध्या आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून सुरू करावे. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. 
-विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com