कांद्री-कन्हान, वानाडोंगरीत चौघांना डेंगी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर - कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. त्यातला त्यात पावसाळा असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. गाजरगवतासह इतर कचरा वाढल्याने डासांना पोषक वातावरण मिळत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, हिवताप, डोकेदुखी, शरीर दुखणे, सर्दी, खोकल्यासारख्या रोगांची लागण झाली आहे. कांद्री कन्हान क्षेत्रात दोन तर वानाडोंगरीत दोघांना डेंगीची लागण झाली आहे. हिंगण्याचे नागरिक डासांमुळे त्रस्त झाले आहेत.

नागपूर - कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नसल्याने सर्वत्र घाण पसरली आहे. त्यातला त्यात पावसाळा असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. गाजरगवतासह इतर कचरा वाढल्याने डासांना पोषक वातावरण मिळत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, हिवताप, डोकेदुखी, शरीर दुखणे, सर्दी, खोकल्यासारख्या रोगांची लागण झाली आहे. कांद्री कन्हान क्षेत्रात दोन तर वानाडोंगरीत दोघांना डेंगीची लागण झाली आहे. हिंगण्याचे नागरिक डासांमुळे त्रस्त झाले आहेत.

एकही आरोग्य सेवक नाही
वानाडोंगरी : हिंगणा-वानाडोंगरी परिसरातील चौघांना डेंगी रोगाची लागण झाली असताना आरोग्य विभाग व नगर परिषद यंत्रणा झोपेतच आहे. वानाडोंगरी नगर परिषदेची लोकसंख्या ५०  हजारांच्या घरात गेली असताना या परिसरासाठी एकही आरोग्यसेवक नसावा, यापेक्षा दुसरी काय शोकांतिका असू शकते.

वानाडोंगरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या वैभवनगर येथील शिवमंदिरजवळ वास्तव्यास असलेल्या श्‍याम बोराडे यांची मुलगी अर्ना बोराडे (७) व भाची मान्या जाधव (८) या दोघींना डेंगीची  लागण झाली. तसेच महाजनवाडी येथील आरती धनराज शेंडे (२०) हिला उपचारानंतर सुटी  झाली. त्याचप्रमाणे राजीवनगरच्या विश्‍वकर्मा शिवशंकर वर्मा (४८) यांनासुद्धा डेंगीची लागण 
झाली होती. उपचारानंतर त्यांनासुद्धा सुटी झाल्याची माहिती रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांनी दिली. वानाडोंगरी येथे नव्याने नियुक्त झालेले आरोग्यसेवक संजय सिडाम वर्षभरासाठी प्रशिक्षणावर गेल्याने एकही आरोग्यसेवक नाही.

डास निर्मूलनाची मोहीम नाही
वानाडोंगरी परिसरात दररोज नवनवीन ले-आउट निर्माण होत आहे. परंतु, सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या नसल्यामुळे रस्त्यावर व खाली भूखंडावर सांडपाणी साचलेले आहे. त्यावर डुकरांचे वास्तव्य असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व नगर परिषदेने डास निर्मूलनाची कोणतीही मोहीम सुरू केलेली नाही.

आरोग्य विभागाने केली पाहणी
टेकाडी - कन्हान, पिपरी नगर परिषदेसह ग्रामपंचायत कांद्रीअंतर्गत दोन डेंगीचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. कांद्री येथील वृद्धेचा व युवकाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बुधवारी आरोग्य सभापती शरद डोणेकर यांना कांद्री ग्रामपंचायत सदस्य विभा पोटभरे यांनी भ्रमणध्वनी करून समस्येबाबत सूचना दिली. डोणेकर यांनी सरपंच बळवंत पडोळे, सचिव दिनकर इंगले, ग्रामपंचायत सदस्य विभा पोटभरे व शिवशंकर चकोले यांच्या समक्ष निरीक्षण करून रिकाम्या भूखंडावर साचलेले पाणी व सांडपाण्यासंदर्भात दक्षता घेण्याची सूचना केली.

त्यानंतर नगर परिषद कन्हान येथील प्रभाग २चे सर्वेक्षण केले. दोन्ही ठिकाणी बिमाऱ्या वाढण्याची शक्‍यता आरोग्य विभागाकडून दर्शविण्यात आली. यानंतर आरोग्य सहायक धोटकर, मारोती मेश्राम, सुरेद्र गिर्हे, एस. आर. पारधी, रजनी चकोले, सविता बावनकुळे, माया तायवाडे, सविता बावणे, कल्पना ऊइके, वैशाली गायकवाड, अनिता वरखडे यांच्याकडून घरोघरी जाऊन टेमीफास टाकण्यात आले. घरातील जलसाठे रिकामे केले.

भूखंडावर कचरा; डासांमुळे नागरिक त्रस्त
हिंगणा - पावसाळ्याचे दिवस असल्याने रिकाम्या भूखंडावर कचरा वाढला आहे. यामुळे डासांची संख्या वाढली आहे. लाखो रुपये खर्च करून फॉगिंग मशीन नगरपंचायतीने खरेदी केली. पावसाळ्याच्या दिवसांत नालीमध्ये औषधांची फवारणी व फॉगिंग मशीनद्वारे धूर सोडण्याचा कार्यक्रम नियमितपणे राबविणे गरजेचे आहे. मात्र, नगरपंचायतीकडे असलेली फॉगिंग मशीन धूळखात पडून असल्याने डासांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. जनतेचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनावर आहे. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक नरेंद्र बेहरे यांनी केली आहे.

हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली
डासांचा प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या घरोघरी वाढत आहे. रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्र  व हिंगणा ग्रामीण रुग्णालयात हिवतापसारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काही वॉर्डांत भूमिगत नाल्या बांधल्या आहेत. काही वॉर्डांत नाल्या खुल्या असल्याने डासांची पैदास वाढत आहे. जनतेचे आरोग्य धोक्‍यात असताना नगरपंचायत प्रशासन मात्र झोपेत असल्याचा आरोप नगरसेवक बेहरे यांनी केला आहे.

पावसाळ्यात रोगांना अधिक वाढ असते. नागरिकांनी जास्त काळ पाणी संग्रहित करू नये.  जलसाठे रिकामे करून स्वच्छ करावे. पाणी फिल्टर किंवा उकळून प्यावे. तापाला साधारण न समझता त्वरित डॉक्‍टला दाखवावे.
- डॉ. चौधरी, वैद्यकीय अधिकारी, कन्हान पीएचसी.

Web Title: Dengue Sickness Health Care