तापसदृश आजार : रोहण्यात डेंगीचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

आर्वी, (वर्धा) : तालुक्‍यात तापसदृश आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. यातच रविवारी (ता. 15) रोहणा येथील कैलास गोविंद अराडे (वय 35) याचा डेंगीने मृत्यू झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कैलास अराडे याला दहा दिवसांपूर्वी ताप आल्याने तो रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता गेला होता. येथील औषधोपचारामुळे त्याला बरे वाटले नसल्याने तो आर्वीतील डॉ. राठी यांच्याकडे औषधोपचारासाठी गेला. परंतु, उपचाराला साथ दिली नाही. शेवटी डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे तपासणी केली असता त्याला डेंगीची लागण झाल्याचे लक्षात आले. येथून त्याला लगेच नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. चार दिवस औषधोपचार करण्यात आले. मात्र, यश आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले असून त्याच्यावर परिवाराच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. यामुळे रोहणा परिसरात शोककळा पसरली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue victim in Rohana villege