दंत महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - दुधाच्या दातांना कीड लागली, दात तुटले, मुलांचे दात वेडेवाकडे आले असे दातांचे असंख्य आजार आहेत. याकडे मुलांसह पालकही दुर्लक्ष करतात. परंतु, मुलांच्या  दातांकडे विशेष लक्ष देण्याची तसेच उपचारासाठी बाल दंतचिकित्सकांची गरज आहे. बाल दंतोपचारतज्ज्ञांचा राज्यात अभाव आहे. परंतु, नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बाल दंतोपचारशास्त्र विभागात दोन पदव्युत्तर जागांना मान्यता मिळाली. ही बाब विदर्भासाठी भूषणावह आहे.

नागपूर - दुधाच्या दातांना कीड लागली, दात तुटले, मुलांचे दात वेडेवाकडे आले असे दातांचे असंख्य आजार आहेत. याकडे मुलांसह पालकही दुर्लक्ष करतात. परंतु, मुलांच्या  दातांकडे विशेष लक्ष देण्याची तसेच उपचारासाठी बाल दंतचिकित्सकांची गरज आहे. बाल दंतोपचारतज्ज्ञांचा राज्यात अभाव आहे. परंतु, नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बाल दंतोपचारशास्त्र विभागात दोन पदव्युत्तर जागांना मान्यता मिळाली. ही बाब विदर्भासाठी भूषणावह आहे.

शहरात ३ हजारांमागे एक तर ग्रामीण भागात ५० हजारांमागे एक दंतचिकित्सक आहे. यातही  बाल दंतरोगतज्ज्ञ शोधूनही सापडत नाही. राज्यातील मुंबई, औरंगाबाद व नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयांत बाल दंतरोगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम नाही. नागपुरात प्रथमच  ‘एमडीएस’ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन जागांना केंद्र व राज्य शासनाने मान्यता दिली. आठ वर्षांनंतर बाल दंतरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. रितेश कळसकर यांच्या प्रयत्नाना आठ वर्षांनंतर यश आले. 

‘ऑल इंडिया’ प्रवेश प्रक्रियेतून आणि राज्यातील प्रवेश प्रक्रियेतून प्रत्येकी एक अशा दोन जागांवर प्रवेश देण्यात आले. पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेले नागपूरचे दंत महाविद्यालय राज्यातील एकमेव विद्यालय ठरले आहे. येथील दोन्ही जागांवर विद्यार्थिनींचा प्रवेश निश्‍चित झाला.

आठ वर्षांचा प्रवास 
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात बाल दंतरोगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी २००९ साली विभागप्रमुख डॉ. रितेश कळसकर यांनी भारतीय दंत परिषद, केंद्रीय कुटुंबकल्याण मंत्रालय, राज्य शासनासह महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला. २०१४ मध्ये भारतीय दंत परिषदेकडून निरीक्षण झाले. तत्कालीन प्रशासनाच्या चालढकलीमुळे प्रस्ताव मागे पडला. यंदा अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर, डॉ. रितेश कळसर यांच्या प्रयत्नांना यश आले. 

२०१७ मध्ये भारतीय दंत परिषदेकडून निघालेल्या त्रुटी अधिष्ठाता डॉ. गणवीर यांच्या पुढाकाराने तत्काळ दूर केल्या. केंद्र व राज्य शासनाने १५ दिवसांपूर्वी दोन जागांना मान्यता दिली. 

भारतीय दंत परिषदेच्या मानकानुसार विभागात वैद्यकीय शिक्षकांसह अत्याधुनिक अशी उपकरणे आहेत, यामुळे बाल दंतरोग विभागात अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. दरमहा मध्य भारतातील १२०० चिमुकल्यांवर येथे उपचार होतात. यापुढे बाल दंतरुग्णांवर निष्णाततज्ज्ञांकडून उपचार होतील.   

-डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर

शालेय अभ्यासक्रमात बत्तीसही दातांची निगा कशी राखावी हे शिकविले जाते. मुलांना समज आली की, दातांच्या आजारांचे वास्तव सांगणारे विषय शालेय अभ्यासक्रमातून शिकविण्याची  सोय असावी. यामुळे दंताचे आजार कमी होण्यास मदत होईल. चिमुकल्यांमार्फत दंत मुखशुद्धीचा संदेश दुर्गम भागात पोहोचवता येईल. 
डॉ. रितेश कळसकर, विभागप्रमुख, शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर.

Web Title: Dental college