अप्पर जिल्हाधिकारी सायकलने कार्यालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • अवैध वाळू व्यवसायावर मोठ्या कारवाई
  • वाळू माफियांनी टाकला होता दबाव
  • घराच्या नेम प्लेटही तोडल्या
  • अप्पर जिल्हाधिकारी म्हणतात, वाळू माफियांना मी कशाला घाबरू!

बुलडाणा : जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू तस्करीवर कर्दनकाळ ठरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या निवासस्थानी प्रवेशद्वारावर दोन नाम फलकाची कुणीतरी तोडफोड केली. प्रकार हा वाळू माफियांनकडून दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. ही घटना 1 डिसेंबरला मध्यरात्री दरम्यान घडली असून, यासंदर्भात शहर पोलिस स्टेशनला तक्रार आज (ता.2) देण्यात आली आहे. या प्रकाराला न घाबरता श्री दुबे आज कार्यालयात सायकलने पोहोचले. 

कर्तव्यदक्ष तथा संयमी अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांची ओळख आहे. ते जिल्ह्यात असल्यापासून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून हजारो ब्रास वाळू शासनदरबारी जप्त करण्यात येऊन मोठा दंडही वसूल करण्यात आला आहे. याच कारणामुळे त्यांचे वाळू माफियांसोबत वैर झाले. ते कोणत्याही आमिष व दबावाला बळी ना पडता रात्री बे रात्री जिल्ह्यात फिरून विना रॉयल्टीचे वाळू घेऊन जाणारे वाहन पकडत असतात. दरम्यान, बुलडाणा येथील सरकारी तलाव मार्गावर संत चोखामेळा नावाचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे सरकारी निवासस्थान आहे. या निवास स्थानासमोरील प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचा व निवासस्थानाचा फलक होता. दोन दिवसापुर्वीच त्यांनी बुलडाणा तालुक्यातील चांडोळ व बुलडाणा शहर येथे अवैधरित्या साठवणूक केलेल्या वाळूवर कारवाई केली. 

याचा धसका घेत 1 डिसेंबरला मध्यरात्री कुणीतरी व्यक्तींनी त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दोन्ही नाम फलकाची तोडफोड केली. ही घटना आज (ता.2) सकाळी उघडकीस येताच त्यांनी या घटनेची तक्रार शहर पोलिसांत दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
 विशेष म्हणजे गेल्यावर्षी 28 डिसेंबर 2018 ला सुध्दा त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशव्दाराची कडी बाहेरून बंद करण्यात आली होती. दरम्यान, आज अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी शासकिय वाहन न वापरता ते चक्क सायकलने जिल्हाधिकारी कार्यालय कर्तव्यावर हजर होत मी कुठल्याही धमकीला भीक घालत नसल्याचे दाखावून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Collector Cycle Office