ठाकरे सरकार नव्हे, हे तर "स्थगिती सरकार', देवेंद्र फडणवीसांनी उडविली खिल्ली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार तर फळबागांना 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची मागणी केली होती. तिघांनीही वचननाम्यात सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. अवकाळी पावसामुळे 93 लाख हेक्‍टर शेतमालाचे नुकसान झाले असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे.

नागपूर : पुरेसा वेळ असताना सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही, तात्पुरते खातेवापट केले. त्यामुळे केवळ खानापूर्तीसाठी सरकार हिवाळी अधिवेशनाचा "फार्स' करीत असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी युतीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्याचे काम वेगाने केल्याचे सांगून हे "स्थगिती सरकार' असल्याची खिल्लीही उडविली. 

सरकारने अधिवेशनाच्या तोंडावर मंत्र्यांना खातेवापट केले. ही खाती तात्पुरती असल्याचे त्यांचेच मंत्री सांगत आहेत. त्यामुळे अधिवेशनात कोणाला प्रश्‍न विचारायचे, कोण उत्तर देणार, दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्तीची जबाबदारी कोण घेणार? असे असंख्य प्रश्‍न आहेत. फक्त हिवाळी अधिवेशनापूरती सरकारला वेळ मारून न्यायची आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला. पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, विनायक मेटे, महादेव जानकर, संजय कुटे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट 25 हजार तर फळबागांना 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची मागणी केली होती. तिघांनीही वचननाम्यात सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. अवकाळी पावसामुळे 93 लाख हेक्‍टर शेतमालाचे नुकसान झाले असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या मागणीनुसार 23 हजार कोटी रुपये भरपाईसाठी द्यावे लागणार आहे. तो निधी तत्काळ द्यावा. ही त्यांचीच मागणी आहे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही त्यांना वारंवार स्मरण करू देऊ. सरकारने आपला शब्द पाळावा, अशीही मागणी फडणवीस यांनी केली.

महत्त्वाची बातमी - सावरकरांचा अपमान करण्याऱ्यांसोबत चहापान नाही

महाराष्ट्राला ठप्प केले 
युतीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा महाआघाडीच्या सरकारने लावला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाला आहे. गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. राज्याच्या विकासासाठी हे योग्य नाही. त्यांनी विकासकामांचा फेरआढावा घ्यावा. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र सुरू झालेली कामे बंद करू नये. सरकार कामे अधर्वट सोडून दिलेला निधी परत घेणार आहे का असाही प्रश्‍न उपस्थित केला. 

राज्य कर्जबाजारी असल्याच्या उलट्या बोंबा 
महाराष्ट्राची आधिक स्थिती उत्तमच आहे. कर्ज काढण्याची मर्याद शिल्लक आहे. मात्र आता दिलेले आश्‍वासन पाळता येत नसल्याचे राज्य कर्जबाजारी असल्याचा उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. त्याकरिता अर्थसंकल्प व अर्थसंकल्पबाह्य कर्ज एकत्रित दाखवून दिशाभूल केली जात आहे. केवळ आकड्यांची जगलरी केली जात असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला. 

अधिक वाचा - Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanvis attack on thakre government at nagpur