esakal | Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis

शिवसेना दूर गेली याचे मनापासून दु:ख वाटते, माझे मित्र उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द मुख्यमंत्रिपदावरून काम करताना मी खाली पडू दिला नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

Exclusive : अमितभाई 'मातोश्री'वर जाणार होते; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.14) केला. निवडणूक निकालानंतर मुद्रित माध्यमांत सर्वप्रथम त्यांनी 'सकाळ'शी गप्पा मारल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फडणवीस म्हणाले, 'शिवसेना त्या काळात दररोज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी बोलत होती. आता तर ते सोनिया गांधींच्या सल्ल्यानेच चालतात. अमितभाईंशी मुख्यमंत्रिपदाबाबत काय ठरले होते हे महत्त्वाचे असे शिवसेना वारंवार म्हणते. पण युती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला काय शब्द दिला होता ते महत्त्वाचे नाही काय? शिवसेनेच्या या घुमजावमुळे त्यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटेल. शिवसेनेसाठी दरवाजे कायम उघडे आहेत. पण संवाद शिवसेनेने स्वत:हून संपवला असल्याने त्यांनाच पुढाकार घेऊन तो सुरू करावा लागेल.'' शिवसेना दूर गेली याचे मनापासून दु:ख वाटते, माझे मित्र उद्धव ठाकरे यांचा एकही शब्द मुख्यमंत्रिपदावरून काम करताना मी खाली पडू दिला नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन असा शब्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देताना हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या जिवावर घडवेन, असा शब्द उद्धवजींनी दिला होता काय, असा प्रश्‍नही फडणवीस यांनी केला आहे. भाजप हा सामूहिक निर्णय घेणारा पक्ष आहे, मंत्रिमंडळातील नावे निश्‍चित करणे हा मुख्यमंत्र्याचा अधिकार असतानाही मी तर सर्व निर्णय कोअर कमिटीशी सल्लामसलत करून घेतले.

- सावरकरांवरून शिवसेनेचा राहुल गांधींना इशारा; 'इथे तडजोड नाही'

अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करणे चूक होते का बरोबर हे काळ ठरवेल; पण मी स्वत: ते बरोबरच होते असे म्हणणार नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्या शपथविधीच्या दोन दिवस आधी अजित पवार आपल्याकडे आले, तीन पक्षांचे सरकार चालणार नाही असे राष्ट्रवादीतील जवळपास सगळ्यांचेच मत असल्याने आम्ही तुमच्याबरोबर येतो असे ते म्हणाले.

जनतेने कौल दिला ती युती प्रत्यक्षात येत नव्हती, त्यामुळे राजकारणात 'रेलेव्हंट' राहण्याच्या एकमेव उद्देशाने आम्ही ते सरकार तयार केले. काही कारणांमुळे मी राजीनामा देतो आहे, असे अजित पवार यांनी येऊन सांगितले. त्यानंतरही सरकार तरू शकले असते, पण कोणताही पक्ष फोडायचा नाही, ही महाराष्ट्राबद्दलची पूर्वघोषित नीती असल्याने मी राजीनामा दिला, असेही ते म्हणाले. 

- पुणे : साडेचार हजार कोटींच्या निविदांची होणार चौकशी; 'सकाळ'च्या वृत्ताची गंभीर दखल!

आपण नागपूर अधिवेशनाला प्रतीक्षेतील मुख्यमंत्री म्हणून जाता आहात की विरोधी पक्षनेता म्हणून, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले : विरोधी पक्षनेता म्हणून. सहा महिने नव्या सरकारला देऊ, ते कसे आकार घेते ते पाहू. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कशी प्रत्यक्षात येते ते पाहू. 

फडणवीस उवाच... 
- तीन पक्षांचे सरकार चालणार नाही. 
- महाराष्ट्र कर्जबाजारी राज्य नव्हे. 
- राज्य सरकारच्या निर्णयांवर अंकुश ठेवू. 
- शिवसेनेने लोकशाहीचा विश्‍वासघात केला आहे.

- धक्कादायक : मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेत मोठा भ्रष्टाचार; कॅगचे ताशेरे

प्रकल्प मार्गी लावले 

सत्ता गेली तरी जलयुक्‍त शिवार, मुंबईतील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागले याचे समाधान आहे. मात्र, पुराचे अतिरिक्‍त पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळविण्यासाठी जो ग्रीड उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता, तो पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागांत सिंचन प्रकल्प सुरू केले, समृद्धी महामार्ग उभा करण्याच्या हालचालींना वेग दिला.

मी विदर्भातील समस्यांचा आढावा घेत त्या सोडवण्याचे प्रयत्न करायचो, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा व्हावा म्हणूनदेखील प्रयत्न केले. आमचे सरकार हे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रश्‍न मार्गी लावण्यालाच प्राधान्य देत होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

सामाजिक प्रश्‍न सोडवण्यासाठी आरक्षण लागू करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दलही समाधान आहे, असे ते म्हणाले. 

पंकजा मुंडेंशी सतत चर्चा 

पंकजा मुंडे यांच्याशी आपण कायम संपर्कात असतो, परवाच मी त्यांच्याशी बोललो, पुन्हा बोलेन असेही त्यांनी सांगितले. भाजपची बांधणी करून राज्यात नव्याने संपर्क मोहीम राबवणार आहोत. विरोधी पक्षाची जागा पूर्णपणे आमच्याकडे असल्याने आता आम्ही महाराष्ट्रव्यापी अभियान करू, असेही ते म्हणाले.

loading image