अमरावती जिल्ह्यातील धानोरा म्हाली बनले "स्मार्ट ग्राम"; जिंकले १० लाखांचे बक्षीस

विवेक राऊत 
Tuesday, 29 September 2020

या योजनेंतर्गत २०१८-१९ साठी तालुकास्तरावरून चांदूररेल्वे तालुक्‍यातील धानोरा म्हाली या गावाची निवड तालुका ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून करण्यात आली आहे.

चांदूररेल्वे (जि. अमरावती) ः पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात इको व्हिलेज ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात ‘स्मार्ट ग्राम’ ही योजना साकारली आहे. या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१८- १९ या वर्षात तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत निर्धारित निकषांमध्ये चांदूररेल्वे तालुक्‍यातून ग्रामपंचायत धानोरा म्हाली या गावाने सर्वाधिक गुण प्राप्त केले आहे. त्यामुळे या गावाला तालुका ‘स्मार्ट ग्राम़ म्हणून गौरविण्यात आले.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बसरणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज
 

‘स्मार्ट ग्राम’ योजनेसाठी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता तपासणी, वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य आणि शिक्षणविषयक सुविधा, केंद्र-राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लॅस्टिक वापर बंदी, ग्रामपंचायतच्या घर व पाणी कर वसुली तसेच पाणीपुरवठा, पथदिवे यासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजबिलांचा नियमितपणे भरणा, मागासवर्गीय, महिला व बालकल्याण, दिव्यांगांवरील खर्च, लेखापरीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन, सामाजिक दायित्व, एलइडी दिवे वापर व विद्युत पथांचे एलइडी दिव्यांमध्ये रूपांतरण, सौर पथदिवे, वृक्षलागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतींचे सर्व अभिलेखांचे संगणकीकरण आदी निकषांचा समावेश होता. 

पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, `नो मास्क नो पेट्रोल`!
 

या योजनेंतर्गत २०१८-१९ साठी तालुकास्तरावरून चांदूररेल्वे तालुक्‍यातील धानोरा म्हाली या गावाची निवड तालुका ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून करण्यात आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख यांच्या स्वाक्षरी असलेले ग्रामविकास विभागाचे प्रमाणपत्र सध्या कार्यरत असलेले ग्रामपंचायत सचिव भास्कर गीद यांना जि. प. कार्यालयातून देण्यात आले. तसेच यामध्ये १० लाखांच्या बक्षिसाचे मानकरीसुद्धा धानोरा म्हाली ग्रामपंचायत ठरले आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanora Mhali in Amravati district became a "smart village"; Won a prize of Rs 10 lakh