गावकऱ्यांच्या श्रमातून फुलली वनराई 

अंकुश गुंडावार/निलेश डोये
सोमवार, 24 एप्रिल 2017

धोपने ठेवला राज्यासमोर आदर्श : लाखोंचा महसूल मिळणार 

नागपूर - पंचायतराज अधिनियमनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून हिवरेबाजारसारख्या गावाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. गावकरी एकत्र आल्यास किती मोठा बदल घडू शकतो हे दाखवून दिले. यातूनच बोध घेत भंडारा जिल्ह्यातील धोप गावाने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातून तब्बल 14 एकरांवर वनराई तयार करून एक नवा आदर्श ठेवला. 

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील धोप गावाचे नाव विदर्भात आदराने घेतले जाते. पंधराशे लोकवस्तीच्या या गावाने वेगळे असे काहीही न करता उपलब्ध संसाधनाचा वापर आणि शासकीय योजनाची जोड देऊन गावालगतच वनराई फुलविली. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीना वृक्षलागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. 

धोप ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच जगदीश्‍वर शेंडे आणि विद्यमान सरपंच मंगला तिकलमंडे व ग्रामसेवक महेंद्र मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी गावातील पडीक व अतिक्रमीत जागेवर वृक्षलागवड करण्याचा निर्धार तीन वर्षांपूर्वी केला. 

त्यानंतर त्या दिशेने पावले उचललीत. वृक्षलागवड करण्यासाठी गावातील जमिनीवरील अतिक्रमण काढून तब्बल 14 एकरांवर वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनरेगाच्या योजनेची मदत घेतली. 14 एकर जागेवर 12 हजारांवर वृक्षांची लागवड केली. यात आंबा, चिकू, पेरू, आवळा, फणस, लिंबू, काजू, हिरडा, बेहडा, सागवानच्या झाडांचा समावेश आहे. 

यातून तिसऱ्याच वर्षीपासून उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. यंदा पेरू, आंब्याचे उत्पादन आले. मात्र, पहिल्या वर्षीचे उत्पादन गावकऱ्यांना वाटण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. पुढील वर्षीपासून या वनराईतून ग्रामपंचायतला 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. या माध्यमातून प्राप्त होणारे उत्पन्न गावाच्या विकासावर खर्च केले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने ग्रामपंचायतने पुन्हा 20 एकरांवर अशीच वनराई तयार करण्याचा संकल्प सोडला आहे. 

382 कुटुंबांना मिळाला रोजगार 
धोप गावाची लोकसंख्या 1,540 असून 382 कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांना वनराईचे संगोपन करण्यासाठी विविध कामे देण्यात आली. मनरेगाअंतर्गत त्यांचे जॉब कार्ड तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. गावात हिरवळ निर्माण झाल्याने आणि हाताला काम मिळाल्याने गावकरीसुद्धा एकदिलाने यात सहभागी झाले. त्यामुळेच रोपवन केलेली सर्व 12 हजार झाडे जिवंत ठेवण्यास मदत झाली. 

ग्रामपंचायतचे महत्त्वपूर्ण योगदान 
पंचायतराज अधिनियमाने ग्रामसभेला बरेच अधिकार मिळाले आहेत. ग्रामपंचायतीने या अधिनियमाची गावकऱ्यांना जाणीव करून देत त्याचा योग्य वापर केल्यास गावाचा कसा कायापालट होऊ शकतो. याचा आदर्श या वनराईच्या रूपाने घालून दिला. यात गावातील प्रत्येक व्यक्‍ती, सरपंच, पदाधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. 

घर तिथे शोषखड्डा 
धोप ग्रामपंचायतीचे कार्य केवळ वनराईपुरतेच मर्यादित नाही. त्यांनी जलसंधारण व मृदसंधारणाची विविध कामे केली. आता जलपुनर्रभरणासाठी घर तिथे शोषखड्डा तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात लोकसहभागदेखील महत्त्वपूर्ण आहे. 
 

Web Title: dhop panchayat plantation