विनयभंगाच्या गुन्ह्यात धोटे बंधूंना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली.

राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24 मेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात पीडितेने विनयभंगाच्या तक्रारीची माहिती धोटे यांना दिल्यानंतर प्राचार्यांना बडतर्फ करण्यात आले होते. 

कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे आणि सचिव अरुण धोटे आहेत तर तक्रारकर्ती विद्यार्थिनी याच संस्थेत द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य गिरीराज कुलकर्णी शरीरसुखाची मागणी करीत होते तसेच अश्‍लील भाषेत शिवीगाळ करायचे. याची तक्रार सुभाष धोटे यांना दिली होती. 29 ऑक्‍टोबर 2018 रोजी वसतिगृहाच्या प्रांगणात प्राचार्य आणि इतर दोघांनी आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार देण्यासाठी 30 ऑक्‍टोबरला पोलिस ठाण्यात भावासोबत गेली. मात्र अरुण धोटे यांनी दबाव आणला. आपल्या भावाला जिवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिली. त्यानंतर वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे राजुरा येथे भाड्याच्या घरात मी राहत होते. महिनाभरापूर्वी धोटे यांच्या संस्थेच्या शाळेतील वसतिगृहात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीला आले. तेव्हापासून माझ्यावर पाळत ठेवली जात होती. त्यामुळे तक्रार देण्याचा निर्णय घेतला, असे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्याकडे तिने तक्रार दिली. त्यानंतर राजुरा पोलिसांनी धोटे बंधू, प्राचार्य गिरीराज कुलकर्णी, धोटे यांचे चालक छगन पाचरे आणि वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. 20) रात्रीच धोटे बंधूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर बल्लारपूर पोलिस ठाण्यात हलविण्यात आले. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. बडतर्फ प्राचार्य कुलकर्णी सध्या तेलंगणात असल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhote brothers arrested in the crime of molestation