...अन्‌ मुरूम खोदता खोदता झाले त्याचे तळे! ...वाचा कसे? 

आनंद चलाख
Monday, 13 July 2020

कोरपना- राजुरा तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भोयगाव साजातील एकोडी शेतशिवारात मुरमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. हे उत्खनन करताना संबंधित कंत्राटदाराकडून अटी व शर्थींचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

राजुरा (जि. चंद्रपूर) : भोयगाव- गडचांदूर- जिवती या राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी एकोडी शिवारातील सुमारे दीड एकर जमिनीतून मुरमाचे उत्खनन केले गेले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने मुरूम उत्खनन केलेले खड्डे बुजविलेच नाही. त्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने त्या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे. 

कोरपना- राजुरा तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भोयगाव साजातील एकोडी शेतशिवारात मुरमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. हे उत्खनन करताना संबंधित कंत्राटदाराकडून अटी व शर्थींचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अंदाजे दीड एकर क्षेत्रात जमिनीपासून 30 ते 35 फूट खोल खोदकाम करून हजारो ब्रास मुरुम काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित शेतातील मुरूम काढलेले ते खड्डे बुजविणे आवश्‍यक होते. मात्र, परवानाधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने उत्खनन क्षेत्रात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून, त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भविष्यात अशा खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

भोयगाव- गडचांदूर- जिवती या राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकरिता आवश्‍यक मुरुमाच्या उत्खननासाठी एकोडी येथील सर्वे क्रमांक 160/02 आराजी 1.82 मध्ये परवानाधारकांना मंजुरी देण्यात आली. या जमिनीतून हजारो ब्रास मुरमाचे उत्खनन करण्यात आले आहे. 

मुख्य रस्त्यापासून शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात खोल खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे या उत्खनन क्षेत्राला आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खोदकाम केलेल्या क्षेत्रातील खोल खड्डे बुजविणे नियमानुसार आवश्‍यक आहे. खोदकाम क्षेत्रालगत वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मरसुद्धा आहे. मात्र, परवानाधारकाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या राज्य मार्गाच्या बांधकामाकरिता एकोडी, कवठाळा, इरई परिसरातून मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा-  भंडारा पोलिस, शाब्बास! क्रेडिट कार्डमधून पळवलेली रक्कम दिली मिळवून परत 

तसेच धुनकी, तळोधी परिसरात उत्खनन करण्याचा परवाना काढण्यात येणार असल्याची नागरिकांत चर्चा आहे. बहुतांश परवाना मिळालेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात उत्खनन केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परवानाधारकांनी कवठाळा, खैरगाव रस्त्यालगतच्या जंगलातून मुरमाची वाहतूक सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याकडे संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. त्यामुळे संबंधित परवानाधारकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

अवश्य वाचा- एसटीच्या मोफत पासचा असाही साईडइफेक्‍ट; ग्रामीण शाळांतील विद्यार्थीसंख्या लागली घटू... 

एकोडी शिवारात मुरम उत्खननाचा परवाना आहे. शेतशिवारात करण्यात आलेले खड्डे बुजविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी परवानाधारकांना सांगावे. परवाना मिळालेल्या ब्रासपेक्षा जास्त उत्खनन केले असल्यास चौकशी केली जाईल. 
- श्री. वाकलेकर, 
तहसीलदार, कोरपना 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By digging land a big lake created there