"यिन टॉक'मध्ये तरुणाईने घेतले "डिजिटल मार्केटिंग'चे धडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथील "यिन टॉक' कार्यक्रमामध्ये आला. निमित्त होते "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे यिन फेस्ट कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल थिंकिंग विषयावरील या कार्यक्रमाचे.
मार्केटिंग गुरू व यू-ट्यूबर साहिल खन्ना यांनी "इम्पॅक्‍टिंग डिजिटल स्पेस एज यू-ट्यूबर' या विषयावर आणि सोशल मीडियातज्ज्ञ अवी आर्य यांनी "डिजिटल मार्केटिंग फॉर हॉस्पिटॅलिटी' या विषयावर त्यांना आलेल्या अनुभवासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरुणाईने त्यांना प्रतिसाद देत या नव्या दमाच्या व्यवसायाबद्दल त्याचे मत जाणून घेत आत्मसात केले. यावेळी जे. डी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक पी. बी. माहेश्‍वरी, संचालक एस. एम. बंग, संचालक एन. एच. पाटील, सचिव अजय अग्रवाल, कार्यकारी संचालक अविनाश दोरसटवार, प्राचार्य डॉ. सुहास चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिव्या चंद्रन यांनी केले.
बहाने मत बनाओ, काम करो ः साहिल
साहिल खन्ना म्हणाले, की आजच्या सोशल मीडियाच्या काळात डिजिटल मार्केटिंग हेच व्यवसायाचे भविष्य आहे. यादृष्टीने आपल्याला आपले कौशल्य विकसित करावे. आपण आपल्या महाविद्यालयात जे शिकतो; तेच घेऊन बाहेर पडतो. मात्र, या सोबतच त्याला पूरक असे कमीत कमी एक कौशल्य आपण आत्मसात करायला हवे. डिजिटल मार्केटिंगबाबत समाजामध्ये आज जागरूकता नाही. आपल्याला व्यवसायाच्या गरजेनुसारच आपले व्यावसायिक ध्येय निश्‍चित करावे लागेल. त्याचे रूपांतर आपल्याला व्यवसायातदेखील करता यायला हवे. स्पर्धेच्या युगामध्ये व्यक्तीला शॉर्टकट हवा असतो. मात्र, प्रत्येक कामामध्ये सातत्य आणि यशस्वी होण्यासाठी जोखीम पत्करने महत्त्वाचे आहे. तो "बहाने मत बनाओ, सिर्फ काम करो'.
वेगळी ओळख निर्माण करा ः अवी
अवी आर्य म्हणाले, आपण आपल्या बद्दलची मूलभूत माहिती इंटरनेटवर शेअर करायला हवी. त्यामुळे, आपल्यातील हे कौशल्य ओळखून आपल्या व्यवसायामध्ये पैसा गुंतविण्यासाठी लोक पुढे येतील. जगाच्या स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर आपल्याला इतरांपेक्षा वेगळे दिसायला हवे. जी गोष्ट सगळे करतात, ती न करता आपली एक वेगळी ओळख समाजामध्ये आपण निर्माण करायला हवी. व्यावसायिकाला आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायची घाई असते. मात्र, सुरुवातीला आपण आपल्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digital marketing in yintalk