अमरावतीत सिक्‍युरिटी एजन्सीचे संचालक निवृत्त सुभेदाराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

कांडलकर यांनी जो पहिला परवाना 2015 साली घेतला होता, तो सहा महिन्यांसाठी होता. त्यानंतर परवाना नूतनीकरणासाठी त्यांनी पोलिस आयुक्तालयाकडे अर्ज केला. परंतु परवाना नूतनीकरण न करताच त्यांनी नियमबाह्य पद्धतीने सिक्‍युरिटी एजन्सी सुरूच ठेवली. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून गणवेश, बॅच, नेमप्लेट जप्त केले.

अमरावती : शहरातील रहाटगाव, शेगाव मार्गावर असलेल्या जोगेश्वर कॉम्प्लेक्‍समधील सैनिक मल्टिपरपज सिक्‍युरिटी एजन्सीच्या कार्यालयाची झडती गाडगेनगर पोलिसांनी घेतली. तेथून काही सामग्री जप्त करून एजन्सीचे संचालक निवृत्त सुभेदार मनोहर गोविंद कांडलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

गुरुवारी (ता. सात) दुपारी गाडगेनगर पोलिसांचे पथक जोगेश्वर कॉम्प्लेक्‍समधील सैनिक मल्टिपरपज सिक्‍युरिटी एजन्सीच्या कार्यालयात झडती घेण्यासाठी पोहोचले. एजन्सीच्या कार्यालयातून पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कमांडोचा ज्या पद्धतीचा गणवेश असतो, तसेच गणवेश, पोलिसांप्रमाणेच असलेले खांद्यावरील स्टार, काही नावांच्या पट्ट्या, टोप्या या सिक्‍युरिटी एजन्सीमध्ये काम करणाऱ्यांना वितरित केल्या होत्या.

निवृत्त सुभेदार मनोहर कांडलकर यांनी 2009 ला ही सिक्‍युरिटी एजन्सी सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडे जवळपास दोनशे सुरक्षा कर्मचारी असून ते विविध ठिकाणी काम करतात.

पोलिसांप्रमाणे गणवेश घालून ही मंडळी शहराच्या काही भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिस विभागाला मिळाली. त्यांनी सत्यता पडताळून बघण्यासाठी गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली असता, कांडलकर यांनी जो पहिला परवाना 2015 साली घेतला होता, तो सहा महिन्यांसाठी होता. त्यानंतर परवाना नूतनीकरणासाठी त्यांनी पोलिस आयुक्तालयाकडे अर्ज केला. परंतु परवाना नूतनीकरण न करताच त्यांनी नियमबाह्य पद्धतीने सिक्‍युरिटी एजन्सी सुरूच ठेवली. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून गणवेश, बॅच, नेमप्लेट जप्त केले.

नियमांमध्ये अनियमितता दाखविल्याप्रकरणी कांडलकर यांच्याविरुद्ध कारवाई केली असून, हा गुन्हा जामीनपात्र असल्याचे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director of security agency arrested in Amravati