छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन् दोन गटांच्या कार्यकर्त्यांत वाद, वाचा काय आहे प्रकरण

सूरज पाटील
Tuesday, 15 September 2020

फलक लावण्यास यापैकी काही कार्यकर्त्यांनी विरोध करणाऱ्यासोबत धक्काबुक्की केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले.

उमरखेड (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या जागेवरून शहरात दोन भिन्न मतप्रवाह आहेत. याबाबत पुतळा संघर्ष समिती दोन वर्षांपासून जागेच्या संबंधाने लढा देत आहे. तर पुतळा समिती नगरपालिकेने ठरविलेल्या जागेवर पुतळा बसविण्याचे समर्थन करीत आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते रविवारी (ता. 13) आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस आल्यानंतर वातावरण नियंत्रणात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पुतळा संघर्ष समिती दोन वर्षांपासून जागेच्या संबंधाने लढा देत आहे व पुतळा समिती नगरपालिकेने ठरविलेल्या जागेवर पुतळा बसविण्याचे समर्थन करीत आहे.

हेही वाचा - जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष? वाचा सविस्तर

रविवारी नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या जागेवर त्या जागेचे समर्थन करणाऱ्या संघटनांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शासनमान्य नियोजित जागा’ अशा आशयाचा फलक लावण्याचा प्रयत्न करीत असताना जागेला विरोध दर्शवून शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांचा पुतळा झाला पाहिजे, याचे समर्थन करणारे संघर्ष समितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचल्याने दोन्ही गटात वाद निर्माण झाला.

फलक लावण्यास यापैकी काही कार्यकर्त्यांनी विरोध करणाऱ्यासोबत धक्काबुक्की केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले.

अधिक माहितीसाठी - बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

त्यानंतर जागेसंदर्भातील विरोधक व समर्थक अशा दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून तत्काळ त्या जागेवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे असले तरी संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याच्या कारणावरून तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यनमध्ये गेले असून, अद्यापपर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

समोपचाराने कसा तोडगा निघेल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील असलेल्या जागेवर पुतळा उभारण्याच्यादृष्टीने सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. परंतु, उमरखेडसारख्या संवेदनशील शहरात ‘त्या’ जागेवर हा पुतळा उभारल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पुतळा संघर्ष समितीने त्या जागेला विरोध दर्शवून शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत संविधानिक मार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत समोपचाराने कसा तोडगा निघेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disagreement over the location of the statue of Shivaji Maharaj