कामगार भवनाच्या जागेला अधिकाऱ्यांची नकारघंटा

चंद्रशेखर महाजन
मंगळवार, 16 जुलै 2019

नागपूर : विदर्भातील कामगारांची सर्व कामे एकाच छताखाली व्हावी याकरिता गायत्रीनगर येथील 30 हजार चौरसफूट जागेवर कामगार भवनाचा प्रस्ताव आहे. 2011 पासून हा प्रस्ताव मंत्रालयातील मुंबईकर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असून कामगार भवनाचीच गरज नाही, असे सांगत अधिकारी तो प्रस्ताव मंजूर करीत नसल्याचे चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे याकरिता दोन वर्षांपूर्वी 18 कोटी रुपये कामगार मंत्रालयाने मंजूर केले आहेत.

विदर्भात 90 हजारांवर नोंदणी झालेले कामगार आहेत. तसेच कामगार मंत्रालयाकडून औद्योगिक धोरणावर चर्चा आणि कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. त्याप्रमाणे कामगारांच्या सर्व योजना या कार्यालयामार्फत राबविल्या जातात. मात्र, कामगारांचे विविध कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कामगारांना कामाकरिता वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले. यावर तोडगा म्हणून कामगार भवनाची संकल्पना पुढे आली. नागपुरातील गायत्रीनगर येथील कामगार विभागाची 5 एकर जागा आहे. सध्या या ठिकाणी नारायण लोखंडे श्रम विज्ञान संस्था कार्यरत आहे. या जागेतील 30 हजार चौरसफूट जागेवर कामगार भवन निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच 2011 मध्ये मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आला. गेल्या आठ वर्षांमध्ये यावर काहीही चर्चा झाली नाही. एवढेच नाही, तर मुंबईतील अधिकारी पाठपुरावा करणाऱ्या विदर्भातील अधिकाऱ्यांना कामगार भवन कशासाठी पाहिजे, असा टोलाही मारतात. येथे स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्याचा विचारही बोलून दाखवितात. त्यामुळे गेल्या 8 वर्षांवर अधिकाऱ्यांच्या मुजोरीमुळे हा प्रस्ताव धूळखात आहे. दोन वर्षांपूर्वी कामगार भवनाकरिता कामगार विभागाने 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. परंतु, जागेचे प्रस्तावच मंजूर न झाल्याने 18 कोटींचा निधीही धूळखात आहे.
कामगारमंत्री संजय कुटेंकडून आस
कामगारमंत्री संजय कुटे हे विदर्भाचे आहेत. विदर्भाबाबत त्यांना आस्था आहे. त्यामुळे कामगार भवनाच्या जागेचा तिढा सोडवतील, अशी आशा कामगारांनी व्यक्‍त केली आहे. 6 जुलै रोजी नागपुरात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. परंतु, हे आश्‍वासन राहू नये, अशी शंकाही कामगार व्यक्‍त करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disclaimer of the workers' land in Kamgar Bhawan