नाराजी नाट्यांचा उडणार भडका; काऊंटडाऊन सुरू

election
election

वाशीम : जिल्हा परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पाचवर्ष ज्या पक्षात खस्ता खाल्या त्या राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्याचे शल्य अनेक दिग्गजांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून जगजाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षात ‘एबी’ फार्मवरून जुन्या निष्ठावंतांना डावलण्याचा मुद्दा समोर येत असताना विधानसभा निवडणुका ज्यांच्यासाठी पायघड्या घातल्या त्यांना एखाद्या गटाचीही उमेदवारी न मिळाल्याने येत्या सोमवारी (ता. 30) या नाराजी नाट्याचा बंडखोरीच्या रुपाने भडका उडणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

निवडणूक रणधुमाळीत भाजपकडून ए. बी. फार्म वाटपावरून उडालेला गोंधळ, जुगलबंदी यामुळे शिस्तबद्ध म्हणविणाऱ्या पक्षातील बेशिस्तपणा समोर आला आहे. मालेगाव तालुक्‍यातील राजुरा जि. प. सर्कलमध्ये भाजपाकडून श्‍याम बढे व रत्नप्रभा रमाकांत घुगे यांनी ए. बी. फार्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोघांनीही आपणच भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला त्यानंतर हे प्रकरण निवडणूक अधिकारी राजेंद्र राऊत यांच्याकडे आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचा युक्तिवाद ऐकला. 

ए. बी. फॉर्म भाजपचा नसल्याची भूमिका
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी रत्नप्रभा रमाकांत घुगे यांनी नामनिर्देश पत्रासोबत दिलेला ए. बी. फार्म भाजपने दिलेला नाही अशा स्वरूपाची भूमिका पत्राव्दारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर मांडली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राऊत यांनी रत्नप्रभा घुगे यांचा अर्ज फेटाळून श्‍याम बढे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे भाजपचा ए. बी. फार्म वाद समोर आला. 

अन् कुपटामधूनच गोंधळ
एकीकडे ए. बी. फॉर्मचा वाद असताना दुसरीकडे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानोरा तालुक्‍यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असताना मानोरा तालुक्‍याची संपूर्ण सूत्रे हलविणारे अरविंद पाटील इंगोले यांना भाजपने अगोदर कुपटामधून उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. पण तेथे विरोध झाल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळाली नाही. शेवटी अरविंद पाटील इंगोले यांना कुपट्यासह गिरोलीमधून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवावा लागला. 

अरविंद पाटील यांचा शब्द होता अंतीम
काँग्रेसमध्ये असताना अरविंद पाटील मानोरा व मंगरुळपीर तसेच कारंजा या तीन तालुक्‍यातील काँग्रेसच्या तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावत होते. किंबहुना त्यांचा शब्द अंतीम राहत असे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने याच अरविंद पाटील इंगोले यांना पक्षात आणून विजयाची गुढी रोवली. आता त्याच भारतीय जनता पक्षात त्यांना साध्या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी न देण्यामागे भाजप नेतृत्वाने कोणते राजकारण साधले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. एकीकडे उमेदवारीवरून भाजपत गोंधळ समोर येत असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेले शिवसंग्राम व रिपाइं आठवले गट यांना तिकीट वाटपात सन्मानजनक स्थान न दिल्याने शेवटच्या क्षणी शिवसंग्रामने दहा ठिकाणी तर रिपाइं आठवले गटांनी चार ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

कारंजा, मानोऱ्यात अर्धीच युती
वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येणार की नाही अशी शंका असतानाच कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत युती होण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन तालुक्‍यांमध्ये काँग्रेस याआधीच आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस स्वबळावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे चित्र समोर येत आहे. वाशिम जि. प. च्या निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात राहावी यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत असतानाच काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार जिल्ह्यात उभे करून सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

सर्वांच्या नजरा 30 डिसेंबरकडे
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे. त्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या सर्कलमधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो. यादरम्यान चर्चेतून महाविकास आघाडी जिल्ह्यात अस्तित्वात येते काय, भाजपा मित्र पक्षाला जागा देतो काय? या प्रश्‍नाचे उत्तर मिळणार आहे.

‘एबी’ फॉर्म बनावट नाही : रत्नप्रभा घुगे
मी दाखल केलेला ‘एबी’ फॉर्म हा बनावट नसून मला पक्षाने दिलेला आहे. त्यामुळे तो मी दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया मालेगाव तालुक्‍यातील राजुरा सर्कलमधील एबी फॉर्म वादावर रत्नप्रभा घुगे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com