एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र इमारतींची झाली दुरावस्था

मनोहर बोरकर
शुक्रवार, 13 जुलै 2018

नगरपंचायत क्षेत्रात 13 अंगणवाडी केंद्रे असून, त्यातील दोन केंद्राच्या इमारती पूर्णता मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

एटापल्ली (गडचिरोली) : नगरपंचायत क्षेत्रात 13 अंगणवाडी केंद्रे असून, त्यातील दोन केंद्राच्या इमारती पूर्णता मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात उघड्यावर बसून शिक्षण घेणे आरोग्यास हानीकारक असल्याने इमारत दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.                 

सदर तेराही इमारतींमध्ये काहींची फरशी, दरवाजे, खिडक्या तुटलेल्या तर काहींच्या छताची कवेलू फुटलेली अशा अनेक दुरावस्था अंगणवाडी इमारतींच्या झाल्या असून, विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास त्रास सहन करावा लागत आहे. दुरावस्था इमारतींची दुरुस्ती करून देण्यास जिल्हापरिषद प्रशासनाकडे अंगणवाडी सेविकांकडून निवेदनातून कळविण्यात आले. मात्र, नगरपंचायत क्षेत्रात जिल्हापरिषद प्रशासन विकास निधी मंजूर करू शकत नसल्याचे कारण सांगून दुरावस्थ इमारती दुरुस्त करण्यास नकार देण्यात आला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष देऊन दुरावस्त इमारती दुरुस्त करण्याची मागणी नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, अंगणवाडी सेविका वच्छला तलांडे, लता कोकुलवार, छाया रामटेके, लीला गेडाम, प्रमिला ओलालवार, राजश्री खोब्रागडे, गुलशन शेख, कविता मुलमुले, अनुसाय झाडे, करूणा मडावी, कौतुका रामटेके, हंसमाला कुंभारे व सुमन गावडे यांनी केली.

Web Title: Distraction of Anganwadi centers in Atapalli Nagar Panchayat area