नवोदयच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी धावले गडचिरोलीचे माजी विद्यार्थी; टॅबही दिले भेट

 गडचिरोली : विद्यार्थ्याला टॅब देताना नेस्मोचे पदाधिकारी.
गडचिरोली : विद्यार्थ्याला टॅब देताना नेस्मोचे पदाधिकारी.

गडचिरोली : देशात बुद्धिवान, प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या नवोदय विद्यालयांचा परिचय सर्वांनाच आहे. या विद्यालयात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्रच ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशावेळेस महागडे मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब नसणारे या विद्यालयाचे गरीब विद्यार्थी अडचणीत आले होते.

पण, या विद्यार्थ्यांच्या मदतीला नवोदय विद्यालयाच्याच माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली नेस्मो (नवोदय एक्‍स स्टुडन्ट्‌स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन) ही संघटना धावून आली. या संघटनेने अशा गरीब विद्यार्थ्यांना थेट टॅब वितरित केले.

नवोदय विद्यालयांमध्ये ग्रामीण विद्यार्थी

कोरोनाच्या संकटात देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद असली; तरी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण, अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने या शिक्षणाला मुकण्याची वेळ येत आहे. केंद्र सरकारद्वारे देशभरातील जिल्ह्यांमध्ये चालविण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालयांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागांतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्यात येते. पण, विपरीत आर्थिक परिस्थितीमुळे काही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेण्यास समर्थ नाहीत. त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आवश्‍यक अँड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब नसल्याने ते अभ्यासात मागे पडत आहेत.


टॅब वितरणासाठी केले आवाहन

हे कळल्यावर घोट येथील नवोदय विद्यालयाचेच माजी विद्यार्थी त्यांच्या मदतीस सरसावले. नवोदय एक्‍स स्टुडन्ट्‌स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन (नेस्मो) या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून या विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना टॅब वितरणासाठी आवाहन करण्यात आले. येथून शिक्षण घेऊन आपले उत्तम करिअर घडवत विविध क्षेत्रात यशस्वी असलेल्या या संघटनेतील सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.

मिशन लास्ट माईल मोहीम

अवघ्या एका आठवड्याच्या आत त्यांनी निधी उभारत दहावी व बारावीच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन टॅब भेट दिले. या संस्थेचे महेश बेझंकीवार, राकेश चडगुलवार व आशीष सोरते यांना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या या विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ‘मिशन लास्ट माईल' नावाची ही संपूर्ण मोहीम नेस्मोचे अध्यक्ष पंकज कांचनकर व सचिव सतीश चिचघरे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

इतरांनीही प्रेरणा घ्यावी

अनेकजण शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेऊन पुढे विविध क्षेत्रात यशस्वी अधिकारी, व्यावसायिक आदी रूपात प्रगती करतात. त्यांनीही त्या काळाची परिस्थिती अनुभवलेली असते. विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाण असते. म्हणून नेस्मोसारख्या संघटनेच्या या अभिनव उपक्रमातून प्रेरणा घेत त्यांनीही आपल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नेस्मोच्या वतीने करण्यात आले आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com