दिव्यांग महिलेला दिला जिल्हाधिकारी यांनी दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एका दिव्यांग महिलेला आज शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

अकोला - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ओटयावर बसलेल्या एका दिव्यांग महिलेला आज स्वत: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी भेट दिली. तिची आस्थेवाईकपणे चौकशी करुन तिला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दिलासाने त्या महिलेच्या डोळयात आनंदाश्रू तराळले. 
 
जिल्हाधिकारी यांनी आपल्या दालनातील बैठका आटोपल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर आल्यावर त्यांचे लक्ष सहज ओटयावर बसलेल्या सुनिता संतोष क-हाळे या दिव्यांग महिलेकडे गेले. स्वत: ओटयावर बसून त्यांनी या महिलेची आपुलकीने चौकशी केली. तिच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिलेला संजय गांधी निराधार योजनेतून लाभ देण्याचे आश्वासन दिले. रेशनकार्ड सुध्दा देण्याचे आश्वासित केले. जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनामुळे व दिलासामुळे महिलेच्या डोळयात अश्रु तराळले व तिने जिल्हाधिकारी यांचे आभार मानले. सुनिता कऱ्हाळे या मोठी उमरी येथे राहत असून त्यांचे पतीसुध्दा दिव्यांग आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दिलेल्या दिलासामुळे ती आनंदली.

Web Title: District Collectorate gave relief to a handicap woman