जिल्हा राष्ट्रवादीत फेरबदल

जिल्हा राष्ट्रवादीत फेरबदल

नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेमध्ये फेरबदल सुरू झाल्यामुळे नाराजी पसरली आहे. अनेक तालुका पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामे सोपविले आहेत. नागपूर जिल्ह्यातील माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यातील मतभेदाची किनार या फेरबदलामागे असल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांचे राजीनामे घेण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी घेतला आहे. केवळ काटोल, नरखेड व हिंगणा तालुका वगळता सर्व तालुकाध्यक्षांना राजीनामे देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर फेरबदल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज आहेत. 

बाबा गुजर यांच्यापूर्वी रमेश बंग जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याकडून जिल्ह्याची कमान खेचून घेण्यात अनिल देशमुख गट यशस्वी झाला होता. बाबा गुजर हे अनिल देशमुख यांचे समर्थक मानले जातात. काटोल व हिंगणा मतदारसंघ वगळल्यास उर्वरित जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा प्रभावी काम करता आलेले नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांचा काटोल मतदारसंघ व हिंगणा मतदारसंघात माजी मंत्री रमेश बंग यांनी वर्चस्व राखले आहे. मात्र, या नेत्यांमध्ये असलेल्या मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला जबर फटका बसला आहे. 

नव्या जिल्हाध्यक्षांना नवीन कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार आहे. त्यातूनच राजीनामे मागितले आहेत. कुणाला दुखावण्याचा प्रश्‍नच नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला पुन्हा पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येईल. 
-बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस

अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत 
उमरेड, भिवापूर, सावनेर, कळमेश्‍वर, पारशिवनी, रामटेक, कुही, कामठी या तालुक्‍यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले असून, बाबा गुजर यांच्या या कारवाईचा निषेधही केला आहे. अनेक पदाधिकारी काँग्रेस व भाजपच्या मार्गावर असल्याचे राजीनामे दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com