बाजारपेठेत खरेदीचा दीपोत्सव; शेतकरी आणि शेतमजुरांची दिवाळी जेमतेमच 

Diwali is not as great for farmers in Maharashtra
Diwali is not as great for farmers in Maharashtra

वर्धा: आनंदोत्सवाचे पर्व असलेली दिवाळी म्हटले की प्रत्येक जण आपापल्या परीने नवीन खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी कोरोनाचा प्रभाव बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. दिवाळीवरही त्याचे सावट दिसत आहे. कोरोनाची मळभ झटकून बाजार स्थिरस्थावर होण्याकडे वाटचाल करीत आहेत. त्यामध्ये नोकरदारांची गर्दी जास्त असून शेतकरी, शेतमजुरांची संख्या मात्र नगण्य आहे. 

कोरोनामुळे यावर्षी सगळ्याच सणांवर विरजण पडले. दिवाळी हा महत्त्वाचा सण असून कोरोनाचा प्रभाव दिवाळीवरही पाहायला मिळत आहे. अनलॉकमध्ये परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशात दिवाळीनिमित्त काही ना काही नवीन खरेदी करण्यासाठी बाजारातील गर्दी वाढू लागली आहे. 

दीपपर्वात कुणी मुहूर्त साधून खरेदी करतो तर कुणी कपडे आणि इतर वस्तू खरेदी करत नवचैतन्य निर्माणकरण्यासाठी धडपडतो. शासनाच्या वतीने नोकरदारांना अग्रिम जाहीर करण्यात आला. त्यामुळे बाजारात नोकरदारांची गर्दी वाढलेली दिसत आहे. सोबतच सर्वसामान्य ग्राहकही बाजारात आहेतच.

बाजारातील वाढलेली गर्दी बाजारव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास हातभार लावणारी ठरत आहे. छोट्‌यापासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाच्याच व्यवसायात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दिवाळीच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी सोबतच कुणी वाहने, कपडे खरेदी करण्यावर भर देत आहे. कपड्याच्या मागणीत देखील हळूहळू वाढ होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने इतरही गरजेच्या साहित्याची खरेदी वाढली आहे. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे.

शेतकरी, शेतमजूर नगण्यच ! 

बाजारात शेतकरी, शेतमजुरांची खरेदीसाठी गर्दी नगण्यच आहे. यावर्षी सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाल्याने शेतकरी, शेतमजुरांना हात आखडता घ्यावा लागला आहे. बाजारात दिवाळी च्या कालावधीत शेतकरी, शेतमजूरही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पण, यावेळी शेतीतील नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडल्याचे चित्र आहे.

ऑफर्सची भरमार

बाजारात सोने, चांदी, कापड तसेच इतर साहित्य खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ऑफर्ससोबतच गिफ्टदेखील ठेवण्यात आले आहेत. ऑफर्सकडेही ग्राहकांचा कल वाढत असल्याचे दिसते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com