दिवाळीत पर्यटनस्थळांवरील वर्दळ वाढली 

file photo
file photo

नागपूर : दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्याने कमी अंतरावरील दोन ते तीन दिवसांच्या सहलीसाठी पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. राज्याबाहेर पर्यटनासाठी बुकिंग होत आहे. यंदाच्या दिवाळी सुटीत बुकिंगमध्ये वाढ झालेली आहे. 
विधानसभेची निवडणूक नुकतीच आटोपल्याने थोडा आराम आणि परिवारासोबत एन्जॉय करीत आहेत. मंदीमुळे यंदा विदेशातील नव्हे तर देशांतर्गत पर्यटनाचे प्रमाण वाढले आहे. नागपूरसह विदर्भातील पर्यटक मेळघाट, शेगाव, चिखलदरा, सिंदखेडराजा, लोणार, रामटेक आदी ठिकाणी जाण्याचा बेत आखत आहेत. रामटेक येथील रामाच्या मंदिरासह मेघदूत स्मृतिस्थळावरही पर्यटकांची गर्दी होत आहे. काहींनी कोकणातील गणपतीपुळे, गुहागर, पावस या ठिकाणांना प्राधान्य दिले आहे. तर नागपुरातील पर्यटकांनी मध्य प्रदेशातील कान्हा किसली, पेंच व्याघ्र प्रकल्प, बर्गी डॅम, पचमढी, भेडाघाट, मैय्यर, बालाजीपूरम, तिरुपती या ठिकाणांबरोबरच अंदमान आणि निकोबारला जाण्याचे नियोजन केले आहे. काही पर्यटकांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि बाली आदी पर्यटनस्थळांकडे कूच केले आहे.
जंगल टूरिझमला पसंती 
थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच जंगल पर्यटनाला छोट्या पर्यटकांची पसंती मिळत आहे. वन्यजीवांबद्दल वाढलेल्या आकर्षणामुळे जंगल सफारीची मागणीही वाढली आहे. पावसाळ्यानंतर अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामुळे ताडोबा, नागझिरा, पेंच या राज्यांतील तर परराज्यातील कान्हा, रणथंबोर, बांधवगड, काझीरंगा या अभयारण्यांच्या जंगल सफारींचे बुकिंग सुरू आहे. पेंचमध्ये अद्याप ऑनलाइन बुकिंग सुरू न झाल्याने ऑफलाइन बुकिंग मिळावी यासाठी पर्यटकांची धावपळ सुरू आहे. 
 

दिवाळीच्या सुटीत शेगाव, मेळघाट, सिंदखेडराजा, चिखलदरा या भागातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. मेळघाट आणि चिखलदरा येथील एमटीडीसीचे रिसोर्ट सात नोव्हेंबरपर्यंत हाउसफुल्ल आहे. पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांनी सहलींचे नियोजन केले आहे. 
- हनुमंत हेडे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन 


ऑनलाइन बुकिंग बंद असल्याने पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येण्यास इच्छुक असलेल्या पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. ऑफलाइन बुकिंग करण्यात येत असले तरी वेळेवर निसर्ग पर्यटनाचे बुकिंग मिळेल की नाही अशी भीती असल्याने रिसोर्ट खाली आहेत. त्यामुळे रिसोर्ट व्यावसायिकांना फटका बसू लागला आहे. प्रथम मंदीचा मार झेलत असलेल्या रिसोर्ट संचालकांना आता ऑफलाइन बुकिंगचाही फटका बसू लागला आहे. 
- चंद्रपाल चौकसे, पर्यटन मित्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com