आजारी पडू नका!

File photo
File photo

आजारी पडू नका!
नागपूर : उपराजधानीत सर्वसामान्य रुग्णांची जीवनदायिनी म्हणजे मेडिकल, मेयो व सुपर आहे. विदर्भातील कामगारांसाठी राज्य कामगार रुग्णालय व डागा रुग्णालय आहे. मात्र, सर्वच रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे नागपूरकरांनो, आजारी पडू नका. औषधे संपल्याने मेयो-मेडिकलमध्ये येऊ नका, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सरकारने औषध खरेदीत एकसूत्रीपणा आणण्याचे कारण पुढे करीत वर्षभरापूर्वी हाफकीनकडूनच औषध खरेदी होईल, असा जाचक अध्यादेश जारी केला. रुग्णालयांनी औषध खरेदीचा पैसा हाफकीनच्या तिजोरीत वळता केला. यामुळे सर्वच रुग्णालयांत औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, औषध भांडारे रिकामी झाली आहेत.
विशेष असे की, उपराजधानीत सरकारी रुग्णालयांत दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून केला. परंतु, निधीतून पाहिजे तसा लाभ झाला नाही. सध्या शहरासह विदर्भात स्क्रब टायफस, डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. किडनी, हृदयरोगासह अन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना औषधे मिळत नसल्याने गरीब रुग्णांना अनेकदा औषधांसाठी रुग्णालयाबाहेर भीक मागण्याची वेळ येत आहे.
बाहेरून दहा लाखांपेक्षा अधिक औषधांची खरेदी
नागपूर जिल्ह्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व छत्तीसगड या सीमा भागातून मोठ्या संख्येने रुग्ण मेडिकल, मेयो, कामगार रुग्णालय, डागासह आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागात दर महिन्याला अंदाजे दोन लाख 10 हजार रुग्णांची नोंद होते. तसेच 30 टक्के रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेतात. औषध भांडारात औषधे नसल्यामुळे रुग्णांच्या हाती प्रीस्क्रिप्शन दिले जाते. दर दिवसाला मेडिकल परिसरातील खासगी औषधालयातून सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक रुपयांची औषधे खरेदी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  
"रेबीज' लस उपलब्ध नाही
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तत्काळ रेबीज लस टोचण्याची गरज असते. उपराजधानीत महापालिकेची ही जबाबदारी आहे. परंतु, नागपूर महानगरपालिका आरोग्यसेवा पुरविण्यात सपशेल नापास झाली आहे. यामुळे गरिबांचे आरोग्य मेयो, मेडिकल, डागा व आयुर्वेद रुग्णालयांच्या भरवशावर आहे. दिवसाला उपराजधानीत कुत्रा चावल्याचे 35 ते 40 रुग्ण येतात. मात्र, मेडिकल, मेयोसह इतर रुग्णालयांत रेबीज लसच उपलब्ध नाही.  
महिन्याभरात बाह्यरुग्णांचा पसारा
रुग्णालय रुग्ण (हजारात)
मेडिकल 90
मेयो 60
सुपर स्पेशालिटी 20
कामगार रुग्णालय 15
डागा रुग्णालय 12
आयुर्वेद रुग्णालय 15
महापालिकेची रुग्णालये 10
सरकारकडून औषधांसाठी होणारा खर्च (वर्षभर)
रुग्णालय रुपये (कोटीत)
मेडिकल 9
मेयो 4
सुपर 2
डागा 1
कामगार 1.5
आयुर्वेद 80 (लाख)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com