माझ्या नागपूरला बदनाम करू नका - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - "संपूर्ण देशात सर्वाधिक गुन्हे नागपुरात घडत आहेत, असे चित्र निर्माण करून विरोधकांनी "क्राइम कॅपिटल' असा उल्लेख केला. तर गुन्हेगारीत महाराष्ट्र "नंबर वन' असल्याचेही विरोधक म्हणाले. गेल्या वर्षभरात गुन्हेगारीत निश्‍चित घट झालेली आहे. त्यामुळे नागपूरची आणि राज्याची बदनामी करू नका,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दोन्ही सभागृहांमध्ये केले. नागपूरसह महाराष्ट्रातील गुन्हेगारी संदर्भात झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते.

सभागृहात दोन दिवस चाललेल्या या चर्चेत महाराष्ट्रातील गुन्हेगारीऐवजी विरोधकांनी नागपूर लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांचे गाव "क्राइम कॅपिटल' होत असल्याचा आरोपही करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी याचे स्पष्टीकरण दिले. "गेल्या दोन वर्षांत नागपूरची हद्द वाढली. लोकसंख्याही पाच लाखाने वाढली असून त्यादृष्टीने नागपुरातील गुन्हेगारी चार टक्‍क्‍यांनी घटली आहे. विरोधी बाकावर असताना दहा वर्षे पोलिस ठाणी वाढविण्याची मागणी करीत होतो. पण, आम्हीच तीन नवीन पोलिस ठाणी प्रत्यक्षात सुरू केली. तुमच्या काळात दोन वर्षे शंभर क्रमांकाची हेल्पलाइन बंद होती, ती देखील सुरू केली,' असे सांगत का एवढा नागपूरवर राग काढताय, असा सवालही त्यांनी केला.

ते म्हणाले, "लोकसंख्येच्या आधारावर गुन्ह्यांची वर्गवारी ठरत असते. प्रतिलाख गुन्ह्यांचा विचार करून "क्राइम रेट' ठरत असतो.

"एनसीआरबी'च्या अहवालानुसार दिल्ली, केरळ, राजस्थान, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आहे. महाराष्ट्र खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 26 वा, महिला अत्याचारांत 15 वा आणि अनुसूचित जातींवरील अत्याचारात 16 वा आहे,' असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मध्यवर्ती कारागृहे ओव्हरलोड होत असून नवीन प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच महाराष्ट्र पुरोगामी आणि न्यायाचेच राज्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

"प्रकाश गजभिये, यु टू?'
वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेत्यांनी नागपूर "क्राइम कॅपिटल' झाल्याचे म्हटले. या चर्चेत प्रकाश गजभियेदेखील सहभागी झाले होते. याचाच दाखला देत मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधी पक्षाचे ठीक आहे; पण प्रकाश गजभिये, यु टू?' असा सवाल केला. त्यावर "गजभिये यांनी या उल्लेखाचे समर्थन केलेले नाही' असे विरोधी पक्षातील सदस्यांनी सांगितले.

Web Title: Do not malign my Nagpur