esakal | रेमेडेसिव्हिरचा अवाजवी वापर टाळा; यशोमती ठाकूरांच्या रुग्णालयांना सूचना

बोलून बातमी शोधा

remdesivir
रेमेडेसिव्हिरचा अवाजवी वापर टाळा; पालकमंत्री यशोमती ठाकूरांच्या रुग्णालयांना सूचना
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : खासगी रुग्णालयांमध्ये रेमेडेसिव्हिर इंजेक्‍शनचा अनावश्‍यक वापर होता कामानये. रेमेडेसिव्हिरच्या उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रुग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्यात या सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्‍टर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना उपचारात रेमेडेसिव्हिर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्‍टर त्याचा अवाजवी वापर करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही रेमेडेसिव्हिरबाबत मागणी होत असेल तर डॉक्‍टरांकडून त्यांचे समूपदेशन झाले पाहिजे.

सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील. रेमेडेसिव्हिर, ऑक्‍सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, महामारीच्या या काळात आवश्‍यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमेडेसिव्हिर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. रेमेडेसिव्हिरचा अनावश्‍यक वापर टाळण्यासाठी व काळाबाजार होऊ नये, यासाठी भरारी पथकही नेमण्यात आलेले आहे. सर्वच रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा पुरवठाही सुरळीत ठेवण्यात येत आहे. कोरोना उपचारांत वेळेवर निदान होणे, कुठलीही लक्षणे जाणवताच वेळीच प्रिव्हेंटिव्ह औषधोपचार सुरू करणे हेही गरजेचे आहे.

हेही वाचा: नागपुरातील अजनीत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; प्रियकराने दिला धोका

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संचारबंदी, कोरोना त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक करण्याबरोबरच जिल्ह्यात "स्टीम सप्ताह' राबविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संदेश प्रसारण, फलक आदी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

संपादन - अथर्व महांकाळ