डॉक्‍टरनेच काढली डॉक्‍टरांची खरडपट्टी; रुग्णांना प्राथमिक उपचार न मिळण्याबाबत नाराजी 

आनंद चिठोरे 
Saturday, 5 December 2020

विष प्राशन केलेल्या एका रुग्णाला डॉ. अजय कडू यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले. त्यावेळी त्याच्या पोटातून विष बाहेर काढण्याकरिता लागणारी नळी तसेच अन्य साहित्य सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते.

पथ्रोट (जि. अमरावती)  ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचार सुद्धा मिळत नसल्याने डॉक्‍टरनेच डॉक्‍टरांची खरडपट्टी काढल्याची घटना आरोग्य केंद्रात घडली. 

विष प्राशन केलेल्या एका रुग्णाला डॉ. अजय कडू यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले. त्यावेळी त्याच्या पोटातून विष बाहेर काढण्याकरिता लागणारी नळी तसेच अन्य साहित्य सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे उपचार करण्याची असमर्थता दाखवून त्या रुग्णाला तालुक्‍याच्या ठिकाणी रेफर करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

प्राथमिक उपचार केंद्रात उपचार होत नसल्याचे पाहून डॉ. अजय कडू यांनी तेथील उपस्थितांची चांगलीच खरडपट्टी काढली. मग तत्काळ रुग्णवाहिका बोलून सदर रुग्णाला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सदरच्या रुग्णाचा जीव वाचला. 

त्यानंतर डॉ. अजय कडू यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील डॉक्‍टरांना रुग्णांचे गांभीर्य नसल्याची माहिती देत घडलेला प्रसंग कथन केला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांनी आरोग्य केंद्रात जाऊन संबंधित प्राथमिक साहित्य तत्काळ उपलब्ध करुन घेण्यासंदर्भात डॉक्‍टरांना आदेश दिले. यावेळी डॉ. अजय कडू, प्रमोद डीके सुद्धा उपस्थित होते.

अधिक वाचा - अमरावतीतील मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण; संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक

गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार सुद्धा करता येत नसतील तर नोकरी सोडून घरी रहा. 
- डॉ. अजय कडू, पथ्रोट.

संपादन - अथर्व महांकाळ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor criticized doctor on giving bad treatment to patients