पुरानं पाणी दूषित झालं अन् आजारी पडलो, पण डॉक्टर उपचारासाठी नकार देतात; ब्रह्मपुरीतील नागरिकांच्या व्यथा

राहुल मैद
Sunday, 27 September 2020

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर इतरही आजारांनी डोके वर काढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील काही खासगी डॉक्‍टर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतानासुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार देत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर): काही दिवसांपूर्वी गोसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यामुळे तालुक्यात महापूर आला होता. त्यावेळी तालुक्यातील ५१ गावे तब्बल तीन दिवस पाण्याखाली होती. त्यामुळे गावातील पाणी प्रदुषित झाले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना खासगी डॉक्टर उपचारासाठी नकार देत आहेत, तर काहींनी रुग्णालये बंद ठेवले आहेत. त्यामुळे अशा डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी नगरपरिषदेचे गटनेते तसेच बांधकाम सभापती विलास विखार यांनी केली आहे.

हेही वाचा -लाखांदूर-पवनी राज्यमार्गावर अवैध वृक्षतोड, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्याचबरोबर इतरही आजारांनी डोके वर काढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत शहरातील काही खासगी डॉक्‍टर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतानासुद्धा रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार देत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत. तर, काही डॉक्‍टरांनी आपली रुग्णालये अशा गंभीर परिस्थितीत बंद ठेवली आहेत. याबाबतच्या रुग्णांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी कुठे जावे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - ठार मारण्याची धमकी देऊन सशस्त्र युवकांनी पळविला वनकार्यालयातील ट्रॅक्‍टर

कोरोना महामारीच्या या परिस्थितीत डॉक्‍टरांनी मानवीय दृष्टिकोन समोर ठेवून आपली रुग्णालये बंद ठेवू नये. तसेच कोरोनाची लक्षणे नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करावा, असे आवाहन विखार यांनी केले आहे.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors not give treatment to people who fell illness due contaminated water in brahmpuri