esakal | लाखांदूर-पवनी राज्यमार्गावर अवैध वृक्षतोड, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

illegal tree cutting on lakhandur pawani state highway in bhandara

लाखांदूर-पवनी राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठी बाभळीची झाडे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना सावली, चारा मिळतो. यावर्षी संततधार पाऊस व वादळाने काही झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्या झाडांची तोडणी करून गोपनीयता बाळगून लिलावाने विक्री केल्याची चर्चा आहे.

लाखांदूर-पवनी राज्यमार्गावर अवैध वृक्षतोड, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

लाखांदूर : गेल्या काही महिन्यांपासून शेतशिवारात विविध पीक असल्याने लाकूड ठेकेदारांना शेतातील वृक्षतोड करता येत नाही. मात्र, काहींनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून राज्यमार्गावरील वृक्षतोड सुरू केली आहे. लाखांदूर-पवनी या राज्यमार्गावर काही महिन्यांपासून नियमित वृक्षतोड सुरू असूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. 

झाडे तोडून रस्त्यावर लाकडे टाकल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. लाखांदूर-पवनी राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठी बाभळीची झाडे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना सावली, चारा मिळतो. यावर्षी संततधार पाऊस व वादळाने काही झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्या झाडांची तोडणी करून गोपनीयता बाळगून लिलावाने विक्री केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - अधिक महिन्याची पूजा जीवावर बेतली, दोन कुटुंबातील चौघे बुडाले

आता या मार्गावर कोणतेही झाड पडण्याची भीती व्यक्त करून सर्रास वृक्षतोड करण्यात येत आहे. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी शहानिशा करत नाही. मात्र, विभागाद्वारे तातडीने वृक्षतोड केली जात आहे. पावसाळ्यात या विभागाने रस्ते बांधकाम कमी व वृक्षतोड अधिक केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रदूषण टाळण्यासाठी शासन स्तरावर वृक्षसंवर्धनाच्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. परंतु, बांधकाम विभागाने लाकूडतोड्यांशी संगनमत करून राजरोसपणे सुरू केलेली वृक्षतोड चिंताजनक असल्याची भीती पर्यवरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन बांधकाम उपविभागाद्वारे सुरू असलेली बेकायदा वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांची चिंता मिटली, एमएचटी-सीईटी परीक्षेला जाण्यासाठी आता विशेष एसटी बसेसची व्यवस्था

सावलीअभावी प्रवाशांचा जीव कासावीस -
राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूंची मोठमोठी झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यात कुठेही सावली नसते. त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. याचप्रमाणे भंडारा-पवनी मार्गाचेही रुंदीकरण करण्यात येत आहे. आता पवनी-लाखांदूर मार्गावरही वृक्षतोड केली जात असल्याने उन्हाळ्यात वाहन चालक व प्रवाशांना कुठेही सावली मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीव कासावीस होईल हे मात्र नक्की.

संपादन - भाग्यश्री राऊत