पिसाळलेला श्‍वान आला लग्नमंडपी आणि मग झाले होत्याचे नव्हते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

लग्न मंडपात श्‍वानाने धुमाकूळ घातल्याची माहिती झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन नागरे यांना मिळाली. त्यानंतर नागरे यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांना घटनेची माहिती दिली. नगर परिषद कर्मचाऱ्यांना श्‍वानाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागभीड (जि. चंद्रपूर) : लग्नमंडपी पिसाळलेल्या श्‍वानाने धुमाकूळ घातला. तब्बल 12 जणांना चावा घेत जखमी केले. ही घटना रविवारी (ता. 16) प्रभाग पाचमधील पंढरी समर्थ यांच्या नातीच्या लग्न सोहळ्याप्रसंगी घडली. नगरपालिका प्रशासनाने पिसाळलेल्या श्‍वानाचा खात्मा केला. 

श्रीधर मोतीराम राखडे (वय 59, रा. नागपूर), संतोष तोडासे (वय 42, रा. नान्होरी), वनिता राजेश चिल्लुरे (वय 30), गोपाळा तुकाराम वाढई (वय 70), राजेंद्र किसन आलबनकार (वय 45), प्रज्ज्वल अरुण कामडी (वय 12) हे श्‍वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या जखमींची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

सविस्तर वाचा - चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात

लग्न मंडपात श्‍वानाने धुमाकूळ घातल्याची माहिती झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन नागरे यांना मिळाली. त्यानंतर नागरे यांनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांना घटनेची माहिती दिली. नगर परिषद कर्मचाऱ्यांना श्‍वानाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. पवन नागरे, उपाध्यक्ष अमोल वानखेडे, सदस्य भास्कर शिंदे यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत पिसाळलेल्या श्‍वानाचा शोध घेऊन खात्मा केला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करा
शहरातील मोकाट श्‍वानांमुळे नागरिकांचे जीवन भयभीत झाले आहे. त्यामुळे नगर परिषदेने विशेष मोहीम राबवून मोकाट श्‍वानांचा बंदोबस्त करावा. या कामात झेप निसर्ग मित्र संस्था सहकार्य करणार आहे. 
- डॉ. पवन नागरे, 
अध्यक्ष, झेप निसर्ग मित्र संस्था, नागभीड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog bite Twelve people at marriage hall in Chandrapur