दीडशे लोकांजवळच कुत्री पाळण्याचा परवाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

अमरावती : विविध प्रजातींची कुत्री पाळणे अनेकांची आवड झाली आहे. परंतु शहरात ज्यांच्या घरी पाळीव कुत्री आहेत; त्यापैकी सव्वाशे ते दीडशे लोकांजवळ असे परवाने नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

अमरावती : पाळीव कुत्र्यांपासून इतरांना त्रास होऊ नये, यासाठी त्याचे संगोपन करणे, योग्य पद्धतीने निगा राखण्याची जबाबदारी ही कुत्री पाळणाऱ्या कुटुंबीयांची असते. शहरात फार कमी लोक असे असतील की, ज्यांच्याजवळ विदेशी प्रजातींची कुत्री आहेत. तेच लोक गावठी कुत्र्यांपासून त्यांना त्रास होणार नाही म्हणून सकाळ, सायंकाळ फिरायला नेतात. त्या कुत्र्यांच्या आवश्‍यक गरजा पूर्ण करण्यासाठी काही जण झटताना दिसतात.
परंतु देशी प्रजातींची कुत्री पाळण्याचा शौक जोपासणारे शेकडो लोक त्यांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात ही पाळीव (गावठी) कुत्री अनेकांच्या घरासमोर, स्वच्छ व गुळगुळीत सिमेट रस्त्यांवर घाण करून ठेवतात. अनेकांवर भुंकतात, काहींच्या वाहनामागे धावतात, काही ठिकाणी गावठी, पाळीव कुत्र्यांनी सामान्य नागरिकांना चावा घेतल्याच्याही बऱ्याच घटना घडल्या आहेत. या गावठी पाळीव कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास हा पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्यांनासुद्धा होतो. त्यामुळे बरीच ज्येष्ठ मंडळी घरातून बाहेर पडताना, कुत्री भूंकू नये म्हणून सोबत काठी बाळगतात. अशावेळी कुत्री पाळणारे व ज्यांना चावा घेतला त्यांच्यात वादाची ठिणगी उडण्याच्या घटना वाढत आहेत. सद्य:स्थितीत आरोग्याचा प्रश्‍नही शहरात गंभीर झाला आहे. अशास्थितीत ज्यांच्याकडे कुत्री नाहीत. त्यांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होत असल्याची बाब निदर्शनात आली. वडाळीसारख्या श्रमजीवी वस्तीत या पाळीव (गावठी) कुत्र्यांपासून अनेकांना त्रास होत आहे.
नियमांचे पालन होत नाही
जर, कुणी कुत्री पाळत असेल तर, त्याचा परवाना संबंधित व्यक्तीने महापालिकेकडून घ्यायला हवा. या सोबत त्याची निगा राखणे, इतरांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे ही जबाबदारी त्या व्यक्तींचीच असते. परंतु नियमांचे पालन होताना दिसत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पाळीव असो किंवा गावठी उपद्रवी कुत्री असो, त्यांना मारता येत नाही. परंतु एखाद्या पाळीव कुत्र्याने कुणाला चावा घेतला असेल, त्रास वाढल्याची तक्रार आल्यास कुत्री पाळणाऱ्यांवर एफ.आय.आर. दाखल होऊ शकतो.
- डॉ. सचिन बोंद्रे,
पशुवैद्यक अधिकारी, महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A dog parent license for close to 150 people