गुन्हे शाखेच्या पाहुणचाराने डॉन आंबेकरची बिघडली प्रकृती

गुन्हे शाखेच्या पाहुणचाराने डॉन आंबेकरची बिघडली प्रकृती

नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक करून एक कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला झोपडपट्टी डॉन संतोष आंबेकर याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पीसीआरमध्ये असताना त्याला चांगला पाहुणचार देण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना संतोष आंबेकरने मुंबईतील मालाडमध्ये भूखंड असल्याची थाप मारली होती. त्या भूखंड विक्रीच्या सौद्यात जून 2018 मध्ये संतोष आंबेकरने पाच कोटी घेतले होते. बनावट दस्तावेज तयार करून भूखंड दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच पटेल यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार केली होती. सीताबर्डीत गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी आंबेकरला अटक केली होती. त्याला पायी फिरवून न्यायालयात हजर केले होते. त्याने खंडणीच्या गुन्ह्यात तब्बल दहा आरोपींची नावे सांगितली. दुसऱ्याच दिवशी आंबेकरचा भाचा नीलेश केदारलाही अटक करण्यात आली. तर हवाला व्यापाराने पैशाची देवाणघेवाण करणारे व्यापाऱ्याच्या कार्यालयात काम करणारे सूरज पटेल (अंकलेश्‍वर-गुजरात) आणि अजय पटेल (मालाड-मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. आज बुधवारी दुपारी डॉन आंबेकरला पोलिस कोठडीत असताना पोलिस समाचार घेत होते. दरम्यान, त्याला भोवळ येत असून अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार आंबेकरने केली. त्यामुळे त्याला लगेच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात तब्बल दहापेक्षा जास्त आरोपींना अटक होण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 
दोघांची चौकशी सुरू 
गुन्हे शाखेने सूरज पटेल (अंकलेश्‍वर-गुजरात) आणि अजय पटेल (मालाड-मुंबई) या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. जिगरभाई पटेल यांनी अंकलेश्वर येथील एका अंगडियामार्फत पाच कोटी मुंबईच्या अंगडिया कंपनीला पाठविले होते. वास्तविक पाहता ज्या मालकाने पैसे पाठविले त्याच्या सांगण्यानुसारच समोरच्या पार्टीला पैसे देण्यात येतात. पटेल यांनी कसलीही सूचना न देताही अजय पटेल याने आरोपींना पाच कोटी देऊन टाकले. त्यामुळे शहर पोलिसांनी सूरज आणि अजय यांना मुंबईतून ताब्यात घेऊन बुधवारी त्यांना नागपूरला आणले. पोलिस दोघांचीही चौकशी करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com