डॉन अरुण गवळी कारागृहाबाहेर

अरुण गवळी
अरुण गवळी

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. गवळीची संचित रजेवर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाकडून मिळताच कारागृह प्रशासनाने बुधवारी दुपारी त्याची मुक्तता केली. त्यानुसार गवळी साथीदारांच्या गराड्यात दुपारी चार वाजता कारागृहाच्या परिसरातून बाहेर पडला.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपात गवळीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. मुंबई आणि येरवड्याच्या तुरुंगात गवळीने काही दिवस शिक्षा भोगली. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून गवळीला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. अनेक वर्षांपासून गवळी येथील कारागृहात बंदिस्त आहे. कैद्यांना दरवर्षी विशिष्ट मुदतीची पॅरोल किंवा फर्लो रजा मिळते. त्यानुसार, कोणत्या तरी कारणावरून गवळी पॅरोल किंवा फर्लोचा लाभ घेऊन हे दिवस कुटुंबीयांसोबत घालवतो. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांना भेटण्यासाठी पॅरोल (संचित रजा) मिळावी यासाठी गवळीने कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, प्रशासनाने तो नामंजूर केला. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
29 एप्रिल रोजी मुंबईत लोकसभा निवडणुका होत्या. जर अरुण गवळीला संचित रजा दिली तर मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येऊ शकते, असा युक्तिवाद त्याच्या संचित रजेला विरोध करताना राज्य शासनातर्फे न्यायालयासमोर करण्यात आला होता. तर, यापूर्वी जेव्हा जेव्हा गवळीला पॅरोल किंवा फर्लोवर सोडण्यात आले, त्यावेळी त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका पोहोचेल असे कृत्य केले नाही, अशी बाजू बचावादरम्यान वकिलांनी मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिलनंतर गवळीची संचित रजा मंजूर केली होती. त्यानुसार, बुधवारी दुपारी गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. बाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या गराड्यात गवळी मुंबईकडे रवाना झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com