"नको नको रे पावसा' : गोसेखुर्द, चिचडोहचे दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

गडचिरोली : "नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमोळी
आणि दारात सायली' प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आता अनेकांच्या ओठावर येत आहे. मागील महिनाभरापासून पावसाने जणू जिल्ह्यात मुक्‍कामच ठोकला आहे. त्यामुळे पूर्वी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे नागरिक आता त्याच्या जाण्याची वाट बघत आहेत. जिल्ह्यात शुक्रवारपासून बंद झालेले मार्ग शनिवारी (ता. 7) बंद होते. शिवाय गोसेखुर्द, चिचडोह धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पूरपरिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

गडचिरोली : "नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमोळी
आणि दारात सायली' प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आता अनेकांच्या ओठावर येत आहे. मागील महिनाभरापासून पावसाने जणू जिल्ह्यात मुक्‍कामच ठोकला आहे. त्यामुळे पूर्वी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे नागरिक आता त्याच्या जाण्याची वाट बघत आहेत. जिल्ह्यात शुक्रवारपासून बंद झालेले मार्ग शनिवारी (ता. 7) बंद होते. शिवाय गोसेखुर्द, चिचडोह धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पूरपरिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती भयावह होत असून गोसेखुर्द व चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसेखुर्द धरणाचे 25 दरवाजे दीड मीटरने, तर 8 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून त्यातून 9816 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्‍यातील चिचडोह बॅरेजचे सर्व 38 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 18204 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना बाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने पुन्हा पूरपरिस्थिती भयावह होण्याची शक्‍यता आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजतापासून आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे. दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी-मुलचेरा हा मार्गही दोन दिवसांत दुसऱ्यांदा बंद झाला आहे. गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी व आलापल्ली-भामरागड हे प्रमुख मार्ग आधीच बंद झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 19 मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. मागील दोन दिवसांपासून झालेली अतिवृष्टी आणि गोसेखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या उपनद्या तसेच नाल्यांमध्ये दाब निर्माण झाला असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. आष्टी-चंद्रपूर मार्ग रात्री 10 वाजतापासून बंद पडला आहे. जिल्ह्यातील शेकडो गावे संपर्काबाहेर असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी दिवसभर प्रशासनाने 150 हुन अधिक नागरिकांना पुराबाहेर काढले. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची घरे कोसळली. जिल्ह्यात दोघे जण वाहून गेले आहेत.
पालकमंत्र्यांचे मदतीचे निर्देश
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्‍यातील 300 गावे संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. तेथील वीज व भ्रमणधवनी सेवा ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. शेकडो घरे क्षतिग्रस्त झाली असून नागरिक पुरामध्ये अडकले आहेत. जिल्हा प्रशासनाने तातडीने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात द्यावा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. घरांच्या, शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने आवश्‍यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Don't want any rain": Gosekhurd, Chichdoh's doors open