न्यायालयाने फेटाळला गुडियाचा जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

नागपूर - उपराजधानीतील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुडिया शाहूचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. या हत्याकांडात तिचा प्रत्यक्ष सहभाग असल्यावरून तिला जामीन नाकारण्यात आला. 

नागपूर - उपराजधानीतील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपी गुडिया शाहूचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. या हत्याकांडात तिचा प्रत्यक्ष सहभाग असल्यावरून तिला जामीन नाकारण्यात आला. 

पवनपुत्रनगरातील रहिवासी उषा कांबळे आणि त्यांची दीड वर्षाची नात राशी या दोघींची फेब्रुवारी महिन्यात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही संतापजनक घटना गणेश शाहू याच्या घरी घडली होती. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी गुडियाने जिल्हा सत्र न्यायालयात दोनदा अर्ज दाखल केले होते. परंतु, दोन्ही अर्ज  नामंजूर करण्यात आल्याने तिने नागपूर खंडपीठात जामिनासाठी याचिका दाखल केली. न्यायमूर्तिद्वय आर. के. देशपांडे व ए. डी. उपाध्ये यांच्या खंडपीठात आज गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. गुडिया हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे दिसून येते. ज्या दिवशी  हत्याकांड घडले त्या दिवशी ती तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर राशीला घेऊन जाताना प्रत्यक्षदर्शीला दिसली. तसेच उषा कांबळे यांच्या किंचाळण्याचा व राशीच्या रडण्याचा आवाज  ऐकू आला. 

विशेष म्हणजे आरोपींनी मृतदेह पोत्यात भरल्यानंतर ते पोते नेताना प्रत्यक्षदर्शीने बघितले. याशिवाय घरात रक्ताचे डाग दिसून आले. तसेच ज्या वाहनातून मृतदेह नेण्यात आले, त्या वाहनातही रक्‍ताचे डाग दिसून आले. 
खून करण्यापासून तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या सर्व कृतीत गुडिया प्रत्यक्ष सहभागी असल्याचे दिसून येते. त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असा युक्‍तिवाद सहायक सरकारी वकील ॲड. संजय डोईफोडे यांनी केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद ऐकून घेतल्यानंतर  खंडपीठाने गुडिया शाहूला जामीन नाकारला. आरोपीतर्फे ॲड. देवेंद्र चौहान, कांबळे कुटुंबीयांतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

Web Title: double murder case court gudia shahu bell reject