द्वेषाचे राजकारण संपणे हीच बापूंना आदरांजली : डॉ. अभय बंग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

डॉ. बंग म्हणाले की, गांधीजींचे विचार प्रत्येक माणसाला कोणत्या न कोणत्या रूपाने स्पर्श करतात. म्हणून 72 वर्षानंतरही आपण त्यांची आठवण करतो. गांधीजींची जादू इतिहासाच्या पानावर मिळत नाही. ते जे बोलत तेच करीत म्हणून त्यांचे जीवन सत्य झाले. जगात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सर्वांत भयंकर आहे. 2050 मध्ये जगाचे तापमान 50 अंश सेल्सिअस राहील. तेव्हा माणूस, पक्षी, जनावरे कसे जगातील, याची मला चिंता वाटते. जागतिक परिषदेत ग्रेटा थनबर्ग हिने जो प्रश्‍न केला, तो गांधीजींच्या विचारांचा आवाज आहे. आपल्या देशात, जाती-पाती, धर्म, भाषा, काश्‍मीर विभाजन यावरून द्वेषाचे राजकारण सुरू आहे.

सेवाग्राम (जि. वर्धा) : पर्यावरणाचा झपाट्याने होणारा ऱ्हास, महिलांना पतीच्या व्यसनाचा होणारा त्रास आणि समाजातील द्वेषाचे राजकारण या समस्यांवर सरकारने कार्य करावे. या समस्या सुटणे हीच महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल, असे विचार शोधग्रामचे संचालक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी गुरुवारी (ता. 30) सेवाग्राम आश्रमात आयोजित "गांधी शहादत' कार्यक्रमात व्यक्त केले.

महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त आश्रम प्रतिष्ठान आणि मित्र परिवारातर्फे महात्मा गांधी शहीददिनाचे आयोजन बापूकुटीच्या आवारात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू होते. आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मा. म. गडकरी, मंत्री मुकुंद मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन धारण करून महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.

- एफडीए गंभीरता दाखवत नाही, मग ग्राहक हिताच्या संरक्षणाचे काय ?

सेवाग्राम आश्रमात "गांधी शहादत' कार्यक्रमात विशेष व्याख्यान
डॉ. बंग म्हणाले की, गांधीजींचे विचार प्रत्येक माणसाला कोणत्या न कोणत्या रूपाने स्पर्श करतात. म्हणून 72 वर्षानंतरही आपण त्यांची आठवण करतो. गांधीजींची जादू इतिहासाच्या पानावर मिळत नाही. ते जे बोलत तेच करीत म्हणून त्यांचे जीवन सत्य झाले. जगात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका सर्वांत भयंकर आहे. 2050 मध्ये जगाचे तापमान 50 अंश सेल्सिअस राहील. तेव्हा माणूस, पक्षी, जनावरे कसे जगातील, याची मला चिंता वाटते. जागतिक परिषदेत ग्रेटा थनबर्ग हिने जो प्रश्‍न केला, तो गांधीजींच्या विचारांचा आवाज आहे. आपल्या देशात, जाती-पाती, धर्म, भाषा, काश्‍मीर विभाजन यावरून द्वेषाचे राजकारण सुरू आहे.

दिल्ली येथे गांधीजी सद्‌भावना, शांतीचे कार्यक्रम घेत, तिथे द्वेषाचे राजकारण सुरू आहे. द्वेष मनात शिरला की, तो मरेपर्यंत संपत नाही. तुटलेला नकाशा जोडू शकतो; मात्र मन तुटले की जुळत नाही. म्हणून "द्वेष छोडो, देश जोडो', हा गांधी विचारांचा नारा बुलंद करावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दारूबंदीची अंमलबजावणी करा
दररोज महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महिलांसमोर पतीचे व्यसन हीच खरी समस्या आहे. गडचिरोलीत सामूहिक पराक्रमाने आणि ग्रामसभेने 600 गावे दारूमुक्त केली. सरकारने चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा हा झोन तयार करून तिथे दारूबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करावी. यावेळी मा. म. गडकरी यांनीही विचार व्यक्त केले. आभार आश्रमचे मंत्री मुकुंद मस्के यांनी मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr abhay band mahatma gandhi death anniversary