अमेरिकेत उभारणार डॉ. आंबेडकर सेंटर

Prashilratna-Gautam
Prashilratna-Gautam

नागपूर - विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एकेकाळी बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनमधील निवासस्थान भारत सरकारने विकत घेतले. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये डॉ. आंबेडकर अध्यासनाची घोषणा झाली. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीपर्वावर अमेरिकेत आंतरराष्ट्रीयस्तरावर डॉ. आंबेडकर सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसार व प्रचाराचे केंद्र असणार आहे, अशी माहिती संघकाय फाउंडेशनचे संयोजक भन्ते प्रशीलरत्न गौतम यांनी दिली.

लंडनमध्ये डॉ. आंबेडकर स्मृती केंद्र आहे. तेथील आंबेडकरवाद्यांनी या केंद्राची स्थापना १९६२ मध्ये केली. या केंद्राला बाबासाहेबांच्या अनेक दैनंदिन वापरातील वस्तू भेट देण्यासंदर्भात बाबासाहेबांचे सचिव नानकचंद रत्तू यांनी आश्‍वासन दिले होते. त्यांच्या निधनानंतर हे आश्‍वासन रत्तू यांच्या पुत्राने पूर्ण केले. त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी भारतामध्ये धम्मदीक्षा सोहळ्यातून दिलेला ‘बुद्ध’ विचार अमेरिकेत उभारण्यात येणाऱ्या बुद्धविहारातून संवर्धित करण्यात येईल, असे ‘सकाळ’शी संवाद साधताना भन्ते प्रशीलरत्न गौतम म्हणाले. 

संघकाय फाउंडेशन आंतरराष्ट्रीयस्तरावर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि प्रसार करणारी संस्था आहे. डॉ. आंबेडकर यांचा बौद्ध धर्म आणि दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान या विचारांचे संवर्धन करणे हेच उद्दिष्ट आहे. गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडो-थाई परिषद घेण्यात आली.

बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीनिमित्त यूएसए, फ्रान्स, श्रीलंका येथे आंतर-धार्मिक शांतता परिषद घेण्याची योजना आखली आहे. श्रीलंका, थायलंड आणि भारतातील भिक्षू यात सहभागी असतील.

बाबासाहेबांची १३० वी जयंती ऐतिहासिक क्षणांची साक्ष देणारी असणार आहे. यामुळेच लंडनप्रमाणे अमेरिकेत बाबासाहेबांचा निवास होता. तेथे जगभरातील बौद्ध देशातील विहार आहेत. मात्र, ‘बुद्ध’ भारतात जन्माला आल्यानंतरही भारतीय बुद्धविहार अमेरिकेत नाही. अमेरिकेशी भारतीयांच्या भावना जुळल्या आहेत. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तेथे बुद्धविहार उभारून डॉ. आंबेडकर सेंटर उभारण्यात येईल. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.  
- भन्ते प्रशीलरत्न गौतम, संघकाया फाउंडेशन, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com