नागरिकांचा ‘भरोसा’ महत्त्वाचा ठरला

अनिल कांबळे
मंगळवार, 31 जुलै 2018

नागपूर - मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांचे शहर म्हणून येथे येताना थोडा दबाव होता. छोट्याशाही घटनेचे पडसाद राज्यभर उमटू शकतात, याची जाणीव ठेवूनच पदभार स्वीकारला. सर्वप्रथम कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’ स्थापन केला. त्यास यश आले. हा पॅटर्न आता इतर राज्यांनीही स्वीकारला आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरातील भूमाफियांना वेसण घातली, संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध, वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यात यश आले. प्रत्येक पोलिस कर्मचारी स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपराजधानी सोडून जाताना समाधानाची भावना असल्याचे मावळते पोलिस आयुक्‍त डॉ. के.

नागपूर - मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांचे शहर म्हणून येथे येताना थोडा दबाव होता. छोट्याशाही घटनेचे पडसाद राज्यभर उमटू शकतात, याची जाणीव ठेवूनच पदभार स्वीकारला. सर्वप्रथम कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’ स्थापन केला. त्यास यश आले. हा पॅटर्न आता इतर राज्यांनीही स्वीकारला आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरातील भूमाफियांना वेसण घातली, संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्ध, वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यात यश आले. प्रत्येक पोलिस कर्मचारी स्मार्ट बनविण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपराजधानी सोडून जाताना समाधानाची भावना असल्याचे मावळते पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. यावेळी त्यांनी सहकार्याबद्दल नागपूरकरांचे विशेष आभार मानले.

रुजू होताच आयुक्तांनी सर्वप्रथम एन-कॉप्स नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू केले. येथे ई-लर्निंग, वाहतूक प्रशिक्षण, सीसीटीएनस प्रशिक्षण, व्यक्‍तिमत्त्व विकास आणि सायबर क्राइमचे सर्वच पोलिसांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नरत असताना सर्वप्रथम दामिनी पथकाची स्थापना केली. त्यामुळे आज युवतींना रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरता येत आहे. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार मिटविण्याची मोठी जबाबदारी होती. त्यासाठी ‘भरोसा सेल’ स्थापन करून एकाच छताखाली वकील, वैद्यकीय सल्ला, निवारा, मागदर्शन, समुपदेशन आणि पोलिस कारवाई उपलब्ध करून दिली. भरोसा सेल महाराष्ट्रात फक्‍त नागपुरात असल्याचे गर्वाने मी सांगू शकतो. 

भूमाफियांच्या ताब्यातून भूखंड सोडविले
शहरात भूमाफियांचे वर्चस्व खंदून काढण्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात आली. त्यांच्याविरोधात धडाकेबाज कारवाई करीत १५०० पेक्षा जास्त नागरिकांना स्वतःच्या भूखंडावर ताबा मिळवून दिला. मोठमोठे भूमाफिया सध्या कारागृहात आहेत तर काहींनी नागपुरातून पळ काढला. महाराष्ट्रातील पहिली डिजिटल चार्जशीट नागपूर शहरातून करण्यात आली. दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे यासाठी डिजिटल स्वरूपात पुरावे, व्हिडिओ सिस्टिमने बयाण घेण्यास सुरुवात केली. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागत होता. मात्र, आज केवळ तीन दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात देण्यास आम्ही सुरुवात केली.

पुणे तेथे काय उणे? 
पारदर्शी कारभार आणि आमूलाग्र बदलासाठी नागपूरकरांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. हीच अपेक्षा पुणेकरांकडूनही करीत आहे. नागपूरप्रमाणेच पुण्यातील गुन्हेगारीवर अंकुश मिळवू तसेच तेथे सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुणे शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था सर्वश्रुत आहे. त्यावर नियंत्रण आणले जाईल, असे डॉ. वेंकटेशम्‌ यांनी सांगितले. 

शहर नॅशनल जिओग्राफीवर
शहरातील कुख्यात गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, त्यांची अचानक तपासणी करणे तसेच त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी सीआरआयएसपी ही सिस्टिम सुरू केली. त्यामुळे प्रत्येक गुन्हेगार थेट आमच्या रडारवर आला. नागपूर पोलिसांचे नाव नॅशनल जिओग्राफी चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पटलावर गेले. 

Web Title: dr. k. venkatesham interview