प्रवीण भोटकर यांना अमेरिकेत डॉ. आंबेडकर रत्न पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अॅन्ड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्युमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रवीण भोटकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ. आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

अकोला - महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे संथापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांना अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अॅन्ड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्युमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्ताने जगभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 127 मान्यवरांचा सत्कार समारंभ संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात आयोजित केला आहे. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील पारस येथील प्रवीण भोटकर यांचा समावेश करण्यात आला आहे. भोटकर यांनी गेल्या 14 वर्षांपासून राज्य विधिमंडळ, मंत्रालय तसेच भारिप बहुजन महासंघाच्या मंत्रालयीन सचिव अशा विविध पदावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रुग्णसेवा, कामगार, परदेशी शिष्यवृत्ती, मागासवर्गीय उद्योजक निर्माण करण्यासाठी शासन स्तरावर लढा, व्यसनमुक्ती, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी दिलेला यशस्वी लढा, संविधान एक्सप्रेस सुरू करण्यासाठीचे अथक प्रयत्न, संविधान दिनी संविधान दौडचे यशस्वी आयोजन, लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेले घर खरेदी करण्यासाठीचे प्रयत्न, पारस विज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीचा लढा, पारस औष्णिक विद्युत प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या हितासाठीचा लढा, बाळापूर मतदारसंघातील रस्त्याच्या सुधारणेसाठीचे प्रयत्न, शिक्षक परिषदांचे आयोजन, लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार सफाई कामगारांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न, विविध आरोग्य शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी अभिनव विमान प्रवास, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून प्रवीण भोटकर यांची निवड करण्यात आली आहे.

जगभरातील देशाचे मुख्यालय असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अर्थशास्त्र आणि सामाजिक न्याय विभागाने प्रवीण भोटकर यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेणे अत्यंत कौतुकास्पद असून महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह आहे. या आधी महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रवीण भोटकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुरस्काराच्या वितरण सोहळ्यास अमेरिका आणि इतरही देशातील प्रतिनिधी, अमेरिकेतील भारतीय दुतावासाचे राजदूत आणि उच्चपदस्थ अधिकारी तसेच फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या सुप्रसिद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप म्हस्के इत्यादी मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातील सेंट्रल हॉल मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमास प्रवीण भोटकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 12 एप्रिल ला प्रवीण भोटकर हे अमेरिकेला प्रयाण करणार आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Praveen Bhotkar will get Ambedkar Ratna Award in USA