आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या डॉ. सतीश गोगुलवारांना राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

येत्या 22 मार्च रोजी होणाऱ्या "आरोग्य आणि मानवी हक्‍क' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार यांना यवतमाळ येथील डॉ. व्ही. एम. पेशवे सामाजिक संशोधन संस्थेद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या 22 मार्च रोजी होणाऱ्या "आरोग्य आणि मानवी हक्‍क' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा आठवा पुरस्कार आहे. संस्थेचे डॉ. राम बुटले, डॉ. राम जाधव आणि संदीप तुंडूरवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली. डॉ. व्ही. एम. पेशवे हे यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले . संशोधन आणि मानवाधिकार हे त्यांच्या अध्यापनाचे क्षेत्र होते.

सविस्तर वाचा - तरुणांमध्ये वाढतेय बॉडी पियर्सिंगची क्रेझ, मागास गडचिरोली जिल्ह्यातही टूम...

त्यांच्या स्मृतिनिमित्त विद्यार्थी वर्गाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा नागपुरात "आरोग्य आणि मानवी हक्‍क' या विषयावर संस्थेच्या वतीने आणि यशोदा गर्ल्स कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून परिषद होत आहे.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत

डॉ. सतीश गोगुलवार मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आदिवासींच्या विविध समस्या सोडविताना वनौषधीपासून विविध उत्पादन तसेच अनेक कौशल्य शिकवून अनेकांना स्वयंरोजगारासाठी त्यांनी प्रेरित केले. समाजातील वंचित घटक, आदिवासी तसेच दिव्यांगांसाठीही त्यांची संस्था कार्य करते. याशिवाय पेसा, वनाधिकार कायद्याबद्दलही ते प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Satish Gogulwar awarded by Rashtriy manvadhikar award