esakal | भक्‍तांना प्रसाद म्हणून दिला पेट्रोल मिश्रित चहा अन्‌ महाराज झाले फरार
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking petrol mixed tea spoils the health of five people at amravati

भक्‍त भजन ऐकण्यात मग्न झाले असतानाच महाराजांनी प्रसाद म्हणून चहा दिला. हा चहा पिल्याने पाच भक्तांना विषबाधा झाली. यातील अजय प्रभुदास चव्हाण (20) याची प्रकृती अधिकच खालावल्याने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भक्‍तांना प्रसाद म्हणून दिला पेट्रोल मिश्रित चहा अन्‌ महाराज झाले फरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : आपण मंदिरात, भजनात, पूजा-पाठेसाठी गेलो की प्रसाद देण्यात येतो. प्रसाद स्वरुपात लाळू, पेढा, साखर, चिरंजी, खडीसाखर आदी देण्यात येते. महाप्रसादात तर जेवणच असते. मात्र, प्रसाद म्हणून चहा देणे आणि तोही प्रेट्रोल मिश्रित हे अजून तरी ऐकले नाही. प्रसाद म्हणून पेट्रोल मिश्रित चहा दिल्याने पाच जणांची प्रकृती खराब झाल्याची घटना अमरावतीत घडली. एका 20 वर्षीय तरुणाची प्रकृती अधिकच खालावल्याने खळबळ उडाली आहे. 

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्‍यातील उंबरी रसुलापूर या गावात राहणारे सुरेश घायसुंदर यांच्या घरी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. भजन सादर करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील प्रसिद्ध संभा उर्फ अंबादास महाराज यांना आमंत्रित केले होते. त्यांचे भजन ऐकण्यासाठी गावातील भजन मंडळी आणि गावकरी बसले होते.

जाणून घ्या - बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी

भक्‍त भजन ऐकण्यात मग्न झाले असतानाच महाराजांनी प्रसाद म्हणून चहा दिला. हा चहा पिल्याने पाच भक्तांना विषबाधा झाली. यातील अजय प्रभुदास चव्हाण (20) याची प्रकृती अधिकच खालावल्याने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रहिमापूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन युवकाचे बयान नोंदविले. चौकशीअंती संभा उर्फ अंबादास महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

नेहमीच देतात पेट्रोल मिश्रित चहा

अंबादास महाराज हे भक्तांना नेहमीच पेट्रोल मिश्रित चहा प्रसाद म्हणून देतात. हा चहा पिल्याने अनेक आजार बरे होतात, अशी भक्तांची भाबडी भावना आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या भजनाच्या कार्यक्रमात प्रसादात दिलेल्या चहामध्ये पेट्रोलचे प्रमाण अधिक झाल्याने भक्तांना विषबाधा झाली.

क्लिक करा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची

गुन्हा दाखल होताच बाबा फरार

पेट्रोल मिश्रित चहा दिल्याने पाच जणांना विषबाधा झाली. चौकशीअंती पोलिसांनी महाराजाविरद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच महाराज पसार झाला. या प्रकरणाचा तपास रहिमापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार शेख जलील करीत आहे. 

चहा पिल्यामुळेच प्रकृती खराब
पेट्रोल मिश्रित चहा पिल्यामुळेच प्रकृती खराब झाली. माझ्यासह अन्य लोकांनासुद्धा महाराजांनी हा चहा पिण्यास सांगितले होते. प्रकृती खराब झाल्याचे आई-वडिलांना सांगितल्यानंतर उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. 
- अजय चव्हाण, उमरी

पोलिसांचे पथक पाठविले 
पेट्रोल मिश्रित चहा पिल्याने पाच जणांनी प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक उमरी येथे पाठविले. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल. आम्ही त्याच्या गावात पोलिस पथकसुद्धा पाठवले आहे. 
- शेख जमील, 
ठाणेदार, रहिमापूर