उसासाठी ठिबक सिंचनाची सक्ती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नागपूर - उसाचे पीक घ्यायचे असेल, तर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सोय करावी लागणार आहे. याबाबचे धोरणच लवकरच राज्य सरकार तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

नागपूर - उसाचे पीक घ्यायचे असेल, तर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सोय करावी लागणार आहे. याबाबचे धोरणच लवकरच राज्य सरकार तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

रेशीमबाग येथे आयोजित आठव्या "ऍग्रो व्हिजन'च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांचे ठिबकचे साडेसातशे कोटी रुपये थकविले. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या लाभार्थ्यांना अनुदान वेळेत मिळाले नाही. आता हा निधी देण्यात आल्याने ठिबक सिंचनाचे वाटप बंद करण्यात आले. उसाच्या पिकाला पाणी जास्त लागते. ठिबक सिंचनासंदर्भात राज्य सरकार नवीन धोरण तयार करीत आहे. यानुसार उसाच्या पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करण्यात येईल. 

सरकार, ऊस कारखानदार आणि शेतकरी यांच्यात करार करण्यात येईल. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यावरील 50 टक्के व्याज सरकार देईल; तर 25 टक्के कारखानदार आणि 25 टक्के व्याजाची रक्कम लाभार्थी भरेल. यामुळे कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेता येणार आहे. उसाला पिकासाठी पाणी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. पाण्याचे नियोजन आणि योग्य उपयोग होणे आवश्‍यक आहे. ठिबकसाठी धोरण ठरविताना गडकरींनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश त्यात केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या दीड वर्षात विदर्भ व मराठवाडा सर्वाधिक कृषी पंप वितरण केले आहे. कृषी फीडर करून 4 हजार सोलर मेगावॅट वीज तयार करण्यात येणार असून, दिवसा 12 तास वीज शेतकऱ्यांना देण्यात येईल. येथील नेत्यांमुळेच दूध डेअरी व्यवसायचे नुकसान झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

Web Title: Drip irrigation for sugarcane Compulsory