esakal | दारुतस्करांनो खबरदार! दोषी आढळल्यास होणार थेट निलंबन; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा 'ऍक्‍शन प्लॅन' तयार 
sakal

बोलून बातमी शोधा

Drug smugglers will get suspended in yavatmal now

जिल्ह्यातून दारूतस्करी आढळल्यास पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात येणार आहे.

दारुतस्करांनो खबरदार! दोषी आढळल्यास होणार थेट निलंबन; जिल्हा पोलिस अधीक्षकांचा 'ऍक्‍शन प्लॅन' तयार 

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने तस्करी केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा पार फज्जा उडत आहे. यातून दारूतस्कर मालामाल होत आहेत. दारूतस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी 'ऍक्‍शन प्लॅन' तयार केला आहे. 

जिल्ह्यातून दारूतस्करी आढळल्यास पोलिस निरीक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार आहे. तर, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

डॉ. दिलीप भुजबळ यांनी पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच अवैधधंदे खपवून घेणार नाहीत, असा सज्जड दम पोलिस अधिकाऱ्यांना दिला. त्यांचा आक्रमक पवित्रा बघता ठाणेदारांना आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. शिवाय अवैध धंदे व त्याला पाठबळ देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन केले. 

प्रथमच एकामागून एक निलंबन होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. आता पोलिस अधीक्षकांनी आपला मोर्चा अवैध दारूतस्करीकडे वळविला आहे. वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत दारूबंदी आहे. मात्र, वर्धा येथे कळंब, बाभूळगाव, वडकी, राळेगावमार्गे आलिशान वाहनातून दारू वाहतूक केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातही वणी, मारेगाव, झरी, मुकुटबन या मार्गाने तस्करी केली जाते. यासाठी पोलिसांकडूनही पाठबळ दिले जात असल्याची बाब खुद्द पोलिस अधीक्षकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे यापुढे बंदी असलेल्या जिल्ह्यात दारू जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

नाकाबंदी करून या तस्करीला आळा घालण्यात यावा. दारूवाहतुकीचा प्रकार आढळून आल्यास संबंधित ठाण्याचे पोलिस निरीक्षकास निलंबित करण्यात येईल. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे. प्रथमच कडक आदेश निघाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तस्करांना फुटला घाम

पोलिस अधीक्षकांनी आपला मोर्चा दारूतस्करांकडे वळविल्याची माहिती बड्या मासांपर्यंत पोहोचली आहे. कोट्यवधींच्या उलाढालीवर एसपींच्या आदेशाने पाणी फेरले जाणर आहे. त्यामुळे हिवाळ्यात तस्करांना घाम फुटला आहे. यवतमाळ शहरात बनावट दारू बनवून बंदी असलेल्या जिल्ह्यात त्याची तस्करी केली जाते. या काळ्या धंद्यालाही आळा बसण्याचे संकेत आहेत.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

क्रिकेट बुकी, मटका व्यावसायिक दहशतीत

आयपीएल सिझनमध्ये क्रिकेट खेळादरम्यान कोट्यवधींचा सट्टा लावला जातो. त्यालाही पोलिस अधीक्षकांनी आळा घातला. छापासत्रामुळे यवतमाळातील बुकींना भूमिगत व्हावे लागले. दिवाळीनंतर त्यांचे यवतमाळात आगमन झाले असले तरी ते कुठेही फिरताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे मटका व्यावसायिकही कारवाईच्या भीतीने दहशतीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image