पुढील वर्षी दुबईची सहल महागणार!

राजेश रामपूरकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुढील वर्षी १६ एप्रिल ते ३० मे या कालावधीत विमानतळ बंद राहणार असल्याची माहिती आहे. मात्र, त्याबद्दल अधिकृतपणे सूचना आम्हाला मिळालेली नाही. विमानतळाच्या नूतनीकरणामुळे विमानांची संख्या कमी होईल. त्याचा फटका टूर्स कंपन्यांना बसणार असून, त्रासही वाढणार आहे. 
- गुणवंत सिंग, अरण्य टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स

नागपूर - तुम्ही जर पुढल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटनासाठी दुबईला जाण्याचा विचार करीत असाल तर खिसा थोडा अधिक हलका करावा लागण्याची शक्‍यता आहे. कारण, दुबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम १६ एप्रिल २०१९ पासून सुरू होणार आहे. धावपट्टीचा दर्जा उंचावण्यासाठी तब्बल ४५ दिवस विमानाच्या हालचालींवर प्रतिबंध येणार आहे. ३० मे २०१९ पर्यंत ही धावपट्टी बंद राहणार आहे. यामुळे भारतातील सर्वच विमान कंपन्यांना विमानाच्या फेऱ्या कमी करण्याच्या सूचना दुबई विमानतळ प्राधिकरणाने दिल्या आहेत. फेऱ्या कमी होणार असल्याने तिकिटांचे दर महागण्याचे संकेत आहेत.   
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेतात धावपटटीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. 

या कालावधीत धावपटटीचे नूतनीकरण, दर्जा उंचावणे, ५५०० दिवे बदलणे, सुरक्षा, सेवेत सुधारणा करणे, धावपट्टीची क्षमता वाढविणे ही कामे होणार आहेत. त्यामुळे पर्यायी विमानतळाचा वापर करावा लागणार आहे. तसे पत्रही जगातील सर्वच विमान कंपन्यांना दुबई विमानतळ प्रशासनाने पाठवले. त्यावर दुबई विमानतळाचे सीईओ पॉल ग्रिफिथ्स यांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान, दुबई वर्ल्ड सेंटरच्या पर्यायी विमानतळाचा वापर करावा लागणार आहे. त्याची क्षमता कमी असल्याने विमानांच्या फेऱ्या कमी केल्या जाणार आहेत. त्यात एअर इंडिया, एअर इंडिया एक्‍स्प्रेससह इतर कंपन्याचा समावेश आहे. नागपुरातून दुबईसाठी एअर अरेबियाची सेवा (शारजा) आहे.

तसेच मुंबई, दिल्लीमार्गेही काही कंपन्यांची तिकिटे मिळतात. त्यामुळे १६ एप्रिल ते ३० मे २०१९ या कालावधीत दुबईला जाण्याचा प्लॅन तयार करीत असाल तर थोडा विचार करा. कारण, या काळात विमानाच्या तिकिटांचे दर महागण्याची शक्‍यता आहे. 

आकडे बोलतात 
विमानतळ बंद राहणार १६ एप्रिल ते ३० मे २०१९
सध्या दररोज विमानांची ये-जा ११०० (२०१७)
भारतातील प्रवासीसंख्या १ कोटी २१ लाख (२०१७)
एकूण प्रवाशांचे आगमन ८ कोटी ८२ लाख (२०१७)

Web Title: dubai tour rate increase runway wark