उद्योगांअभावी भंडारा जिल्ह्यात वाढती बेरोजगारी

file photo
file photo

भंडारा : बदलत्या गरजांमुळे जिल्ह्यातील जुने उद्योग डबघाईस आले असून, प्रस्तावित नवीन उद्योगही सुरू झाले नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी, जिल्ह्यात बेरोजगारीची संख्या सतत वाढत आहे. यात दरवर्षी हजारोंची वाढ होत असल्याने रोजगार मिळवण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे.
भंडारा शहर पूर्वी पितळी भांड्यांसाठी प्रसिद्ध होते. शहरातील वेगवेगळ्या भागात 50 पेक्षा अधिक कारखान्यात दिवसरात्र पितळ धातूपासून वेगवेगळी भांडी तयार केली जात होती. तसेच कांसे, तांबे आदींची भांडीही येथून विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात विक्रीला पाठवली जात होती. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर येथील कारखान्यात कामासाठी आले. त्यांना हमखास रोजगार मिळत होता. परंतु, प्लॅस्टिक आणि स्टीलपासून कमी किमतीत अधिक टिकावू भांडी बाजारात आल्यामुळे ग्राहकांकडून पितळी भांड्यांची मागणी अचानक घटली. त्यामुळे शहरातील पितळ उद्योगाला उतरती कळा लागली आहे.
तुमसर तालुक्‍यात आशिया खंडातील उच्च प्रतीचे मॅगनीज मिळते. इंग्रज शासनकाळापासून डोंगरी व चिखला येथे मॉयलच्या खाणी आहेत. तुमसरजवळील माडगी येथे यूनिफेरो कारखान्यात शुद्ध मॅगनीज तयार केले जात होते. परंतु, 12 वर्षापूर्वी मालकाने कारखान्याला कुलूप लावले. तेव्हापासून दीड हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले. लोकप्रतिनिधींनी कारखाना सुरू व्हावा याकरिता मंत्रालय स्तरावर प्रयत्न करून मालकांची बैठक घेतली. यात कोट्यवधी रुपयांचे वीज बिल माफ केल्यावरही कारखाना सुरू झाला नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम मिळवून देणारे बिडी उद्योग, हातमाग उद्योग, कोसा उद्योग यांना उतरती कळा लागली आहे. विणकर कुटुंबातील लाखो युवकांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले आहे. लाखांदूर जवळचा साखर कारखान्याचा गाशा गुंडाळण्यात आला आहे. गडेगाव औद्योगिक क्षेत्रातील वरम एनर्जी कारखान्यातील ठेकेदाराने पलायान केले आहे.

कंत्राटी पद्धतीवर भर
जिल्ह्यात सनफ्लॅग स्टील कंपनी व अशोक लेलॅंड हे नवीन मध्यम उद्योग आहेत. परंतु, या कंपन्यातील बरेच काम अस्थायी व कंत्राटी कामगारांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक युवकांना येथे काम मिळत नाही. येथे कार्यरत असलेले बहुतेक सर्व अधिकारी व अभियंते परप्रांतीय आहेत.

राइस मिल्समध्ये अर्धवेळ काम
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतात. त्यामुळे जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक राइस मिल्स आहेत. परंतु, खरीप हंगामानंतर ऑक्‍टोबर ते मार्च या काळातच राइस मिलचे काम सुरू असते. त्यानंतर खरेदी केलेले तांदूळ विक्रीतून मिलचे इतर खर्च भागवावे लागतात. शिवाय गावाच्या परिसरात उधारीच्या व्यवहारामुळे मिल मालकांना वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होईपर्यंत रक्कम मिळत नाही.

वाळूचोरीचा आधार
जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी, चुलबंद नद्यांच्या पात्रातील बारीक वाळूला चांगली मागणी होते. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील गावांत वाळू विक्रीचा मुख्य व्यवसाय झाला आहे. या गावातील युवक बॅंकेच्या कर्जावर ट्रॅक्‍टर, टिप्पर घेऊन नदीच्या पात्रातील वाळूचे गावाजवळ साठे तयारी करून त्यातील वाळूची विक्री करतात.

भेलमुळे अपेक्षाभंग
सहा वर्षीपूर्वी मुंडीपार येथे भेलसाठी जमिनी खरेदी करून भूमिपूजन करण्यात आले. मात्र, सुरक्षा भिंतीशिवाय कोणतेही काम झाले नाही. हा कारखाना सुरू करण्यासाठी स्थानिक बेरोजगार व शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. भेलमध्ये रोजगार मिळण्याची आशा बाळगणाऱ्या युवकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com